छत्रपती संभाजीनगर : इंजिनिअरिंग कॉलेजच्या HOD चा 'दृश्यम' स्टाईल खून, 40 दिवसांनंतर प्राध्यापकाचं हत्याकांड समोर
Chhatrapati Sambhajinagar Crime : या थरारक हत्याकांडाचा कट अत्यंत थंड डोक्याने रचण्यात आला होता, ज्यामध्ये मुख्य आरोपी विशाल राठोड याने आपल्या मेहुण्यासह साथीदारांची मदत घेतली होती. हत्येच्या तीन दिवस आधीच आरोपींनी गेवराई तांडा येथील निर्जन जंगलात जेसीबीच्या साहाय्याने दोन मोठे खड्डे खोदून ठेवले होते आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून 'गुप्तधनाची' शोधमोहीम सुरू असल्याचे खोटे कारण सांगितले होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
छत्रपती संभाजीनगर : इंजिनिअरिंग कॉलेजच्या HOD चा 'दृश्यम' स्टाईल खून
40 दिवसांनंतर समोर आलं हत्याकांड
Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा भागातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे निवृत्त विभागप्रमुख राजाभाऊ सुबराव लोंढे यांच्या बेपत्ता होण्याचे गूढ अखेर दिवसांनंतर उकलले असून या प्रकरणाने 'दृश्यम' चित्रपटाच्या कथानकाची आठवण करून दिली आहे. आर्थिक वादातून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलेल्या या हत्येचा छडा लावण्यात गुन्हे शाखेला यश आले असून पोलिसांनी मुख्य आरोपी विशाल राठोड याच्यासह तिघांना अटक केली आहे. 5 फेब्रुवारी 2026 पासून बेपत्ता असलेल्या लोंढे यांची हत्या करून त्यांचा मृतदेह जंगलात खड्डा खोदून गाडण्यात आला होता, मात्र तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्याचा पर्दाफाश केला असून आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे.
फार्महाऊसवर नेऊन दारु पाजली, येताना गोळ्या घालून संपवलं
या थरारक हत्याकांडाचा कट अत्यंत थंड डोक्याने रचण्यात आला होता, ज्यामध्ये मुख्य आरोपी विशाल राठोड याने आपल्या मेहुण्यासह साथीदारांची मदत घेतली होती. हत्येच्या तीन दिवस आधीच आरोपींनी गेवराई तांडा येथील निर्जन जंगलात जेसीबीच्या साहाय्याने दोन मोठे खड्डे खोदून ठेवले होते आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून 'गुप्तधनाची' शोधमोहीम सुरू असल्याचे खोटे कारण सांगितले होते. 5 फेब्रुवारीच्या रात्री पार्टीच्या बहाण्याने लोंढे यांना दौलताबाद येथील एका फार्महाऊसवर नेऊन त्यांना मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन करण्यास भाग पाडले आणि परतीच्या प्रवासात साजापूर शिवार येथील रेल्वे पुलाजवळ त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या केली.
हेही वाचा : 11 व्या वर्षी बलात्कार, 12 व्या वर्षी लग्न, 13 व्या वर्षी बनली आई; तीन वर्षानंतर 'असं' बाहेर आलं प्रकरण
मृतदेह जंगलात नेऊन पुरला
गुन्हा केल्यानंतर आरोपींनी पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी लोंढे यांचा मृतदेह आधीच तयार करून ठेवलेल्या खड्ड्यात टाकून त्यावर माती टाकली जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. सुरुवातीला तपासादरम्यान मुख्य आरोपी विशाल राठोड याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि लोंढे यांना सिग्मा हॉस्पिटलजवळ सोडून दिल्याचे खोटे सांगितले. मात्र, गुन्हे शाखेने शहरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनची सखोल तपासणी केली असता आरोपीचा बनाव उघड झाला. पोलिसांनी जेव्हा पोलिसी खाक्या दाखवला, तेव्हा आरोपींनी खुनाची कबुली दिली आणि ज्या ठिकाणी मृतदेह गाडला होता त्या जागेची माहिती दिली.










