अमरावतीत मुलीवरून वाद, धारदार शस्त्राने हाताचा पंजा सेपरेट करत संपवलं
Amravati crime : अमरावतीमध्ये धक्कादायक आणि खळबळजनक हत्याकांडामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. शहरातील राजेंद्र कॉलनी - विजय कॉलनी परिसरात एका तरुणीवरून वाद झाला. या वादात एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला, त्या हल्ल्यात तरुणाच्या हाताचा पंजा वेगळा झाला, या घटनेनं परिसर हादरून गेला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तरुणीवरून वाद उफळला
धारदार हल्ल्यात हाताचा पंजा वेगळा
Amravati Crime : धनंजय साबळे - अमरावतीमध्ये धक्कादायक आणि खळबळजनक हत्याकांडामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. शहरातील राजेंद्र कॉलनी - विजय कॉलनी परिसरात एका तरुणीवरून वाद झाला. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी बोलावण्यात आलेल्या एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी तरुणाच्या गळा, छाती आणि पोटावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तरुणाने हात पुढे केला असता, त्याच्या हाताचा पंजा वेगळा झाला. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हाताचा पंजा पाहून परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना बुधवारी 15 जुलै सकाळी घडल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा : दहावीच्या विद्यार्थिनीवर कॅफेत लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
तरुणीवरून वाद उफळला
या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाची आफाक शेख शकील (रा. ताज नगर) अशी ओळख पटली. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, ही थरारक घटना बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोरवाल सिमेंट डेपोजवळ घडली. आफाक आणि दुसऱ्या गटामध्ये एका मुलीच्या कारणावरून आधीपासूनच वाद सुरू होता. हाच वाद मिटवण्यासाठी दोन्ही गटांना घटनास्थळी बोलावण्यात आले होते. मात्र, चर्चा सुरू असतानाच दोन्ही गटांतील वाद विकोपाला गेला आणि त्याचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले. याच रागातून आरोपींनी आफाकवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला.
धारदार हल्ल्यात हाताचा पंजा वेगळा
या भीषण हल्ल्यात आफाक गंभीररित्या जखमी झाला होता. त्याच्या शरीरावर अत्यंत खोल घाव घालण्यात आले होते. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याने हात आडवा केला, अशा स्थितीत त्याच्या हातावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या नंतर तरुणाच्या हाताचा पंजा खाली पडला होता. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी अवस्थेतील आफाकला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरील परिसराची नाकेबंदी करत पंचनामा केला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून रुग्णालयाला छावणीचे स्वरूप आले होते.
हे ही वाचा : Devendra Fadanvis : '48 हजार कोटी रूपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे बिल माफ', मुख्यमंत्र्यांची घोषणा
तीन अल्पवयीन मुलं ताब्यात
अमरावतीच्या पोलीस उपायुक्तांनी (डीसीपी) दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात ही हत्या मुलीच्या वादातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून अत्यंत वेगाने कारवाई करत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. या ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये तीन अल्पवयीन आणि एका सज्ञान मुलाचा समावेश असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. सध्या तपास प्राथमिक टप्प्यात असल्याने आणि आरोपींपैकी काही अल्पवयीन असल्याने त्यांची नावे सार्वजनिक करण्यात आलेली नाहीत. पोलीस हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त करण्याचे व इतर पुरावे गोळा करण्याचे काम करत आहेत. या नृशंस हत्याकांडामुळे राजेंद्र कॉलनी, विजय कॉलनी आणि ताज नगर भागात तणावाचे व दहशतीचे वातावरण असून तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.










