तरुणीने दिलेला नकार पचवता येईना, अरबाजने थेट घरात पेट्रोल बॉम्ब फेकला
Crime News : लग्नास नकार दिल्याच्या रागातून भोपाळमध्ये एका तरुणाने 24 वर्षीय तरुणीच्या घरात पेट्रोल बॉम्ब फेकला. या घटनेत घरातील फ्रीजसह इतर वस्तूंचे नुकसान झाले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तरुणीने दिलेला नकार पचवता येईना
अरबाजने थेट घरात पेट्रोल बॉम्ब फेकला
MP Crime News : मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये लग्नास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने 24 वर्षीय तरुणीच्या घरात पेट्रोल बॉम्ब फेकल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पेट्रोल बॉम्ब घरातील स्वयंपाकघरात पडल्याने आग लागली. या आगीत घरातील सामानाचे नुकसान झाले. त्यात फ्रीज आणि इतर घरगुती वस्तूंचाही समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
तरुणीवर लग्न करण्यासाठी टाकत होता दबाव
ACP शैलेंद्र सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचे लग्न एका तरुणासोबत ठरले होते. त्यानंतर आरोपी अरबाज उर्फ भय्यू हा तरुणीवर त्याच्याशी लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. तरुणीने यापूर्वीच त्याचा प्रस्ताव नाकारला होता. मात्र, त्यानंतरही अरबाज तिचा पाठलाग करत होता आणि तिला धमकावत होता. घटनेच्या दोन दिवस आधी सकाळी तो तरुणीच्या घरी गेला होता. त्यावेळी त्याने पुन्हा तिला धमकी दिली. तरुणीने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर आरोपी तेथून निघून गेला. मात्र, त्यानंतरही तो फोनवरून तरुणीला धमक्या देत राहिला. त्याने तरुणीच्या होणाऱ्या पतीलाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
आधी दुचाकीचे नुकसान, नंतर घरात पेट्रोल बॉम्ब
यानंतर त्याच दिवशी सायंकाळी सुमारे पाच वाजता अरबाज पुन्हा तरुणीच्या घरी आला. त्यावेळी तरुणी तिच्या जाऊसोबत घराबाहेर उभी होती. आरोपीने तिच्या दुचाकीवर दगड फेकून तिचे नुकसान केले. त्यानंतर त्याने घरात पेट्रोल बॉम्ब फेकला आणि तेथून पळून गेला. पेट्रोल बॉम्ब स्वयंपाकघरात पडला. त्यानंतर तेथे आग लागली. आगीच्या ज्वाळा घरातील इतर वस्तूंपर्यंत पोहोचल्या. या आगीत फ्रीजसह घरातील इतर वस्तू जळाल्या. या वस्तूंचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. त्यानंतर तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अरबाज उर्फ भय्यूविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
