प्रेयसीला घरात ठेवण्यासाठी हट्ट, विरोध केल्याने ज्या आईने जेलमधून सोडवून आणलं, तिलाच संपवलं
Crime News MP : एका वृद्ध महिलेच्या संशयास्पद मृत्यूचा गुंता पोलिसांनी 48 तासात सोडवला असून, तिच्या पोटच्या मुलानेच हत्या केल्याचे समोर आले आहे. अनैतिक संबंधांमुळे आणि आईने घरात ठेवण्यास नकार दिल्याने संतापलेल्या मुलाने आईचा गळा दाबून खून केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रेयसीला घरात ठेवण्यासाठी हट्ट
विरोध केल्याने ज्या आईने जेलमधून सोडवून आणलं, तिलाच संपवलं
Crime News MP : मध्य प्रदेशातील ग्वालियर जिल्ह्याच्या डबरा परिसरातील पिछोर भागात दोन दिवसांपूर्वी एका वृद्ध महिलेचा संशयास्पद अवस्थेत आढळलेला मृतदेह, एका निर्घृण हत्येचे प्रकरण असल्याचे समोर आले आहे. ग्वालियर पोलिसांनी अत्यंत कौशल्याने अवघ्या 48 तासांच्या आत या ब्लाइंड मर्डर केसचा उलगडा केला असून, या धक्कादायक घटनेत आईची हत्या दुसऱ्या कोणी नसून तिच्या पोटच्या मुलानेच केल्याचे निष्पन्न झाले आहे. मृत महिलेची ओळख लक्ष्मी रजक (पती स्वर्गीय बालकिशन रजक) अशी पटली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मुलाला अटक केली असून, एका साक्षीदाराचा जबाब देखील नोंदवला आहे.
प्रथमदर्शनीच हे प्रकरण हत्येचे वाटत होते, कारण महिलेच्या गळ्याभोवती तिचाच स्टॉल गुंडाळलेला होता, ज्याने गळा आवळून तिची हत्या करण्यात आली होती. पोलीस तपासात आरोपी मुलगा संजय रजक याच्या काळ्या कर्तृत्वाचा पाढा समोर आला. मृत लक्ष्मी देवी या पुड्या आणि सिगरेट विकून आपला उदरनिर्वाह करत होत्या. मात्र, मुलगा संजय याला जुगार आणि नशेचे भयंकर व्यसन होते. संजयची पत्नी त्याला सोडून गेली होती आणि तिने त्याच्यावर केस दाखल केली होती, ज्यामुळे तो झाशी जेलमध्ये बंद होता. आईने जसेतसे दीड लाख रुपये देऊन सेटलमेंट केले आणि त्याला जेलमधून बाहेर काढले होते, पण त्याच्या वागण्यात सुधारणा झाली नाही. संजयचे एका विधवा महिलेसोबत अनैतिक संबंध होते. तो आईला त्या महिलेला घरात ठेवण्यासाठी सतत आग्रह करत होता. घरात एक तरुण बहीण असल्याने आईने त्याला दरवेळी स्पष्ट नकार दिला. याच वादातून संतापलेल्या संजयने आईचा काटा काढण्याचा निर्दयी निर्णय घेतला.
हेही वाचा :Personal Finance: स्वस्त पर्सनल लोन हवं? SBI, HDFC, ICICI सह टॉप 8 बँकांच्या व्याजदर
असे सुटले हत्येचे गुढ; पोलिसांची तांत्रिक तपासाची जोडी
हत्येच्या रात्री अन्य लोकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली होती. धक्कादायक म्हणजे, पोटची आई वारली असतानाही संजय पोलीस ठाण्यात पोहोचला नाही, ना त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचे भाव होते. या अस्वाभाविक वर्तणुकीमुळे पोलिसांचा संशय सुरुवातीपासूनच संजयवर होता, मात्र तो पोलिसांना लूट आणि चोरीच्या खोट्या गोष्टी सांगून सतत चकवा देत होता. डबरा ठाण्याचे प्रभारी शिवम राजावत यांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास चक्रावून फिरवले. पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला. एका फुटेजमध्ये संजयचा मित्र आजम खान हा घटनेच्या रात्री संजयसोबत बाईकवर जाताना दिसून आला. पोलिसांनी तातडीने आजम खानला ताब्यात घेऊन त्याची सक्तीने चौकशी केली. पोलिसांच्या कचाट्यात अडकलेल्या आजमने हत्येची सर्व हकीकत उलगडून सांगितली आणि संजयची पोलखोल झाली. आजम खानने या प्रकरणाचा साक्षीदार म्हणून पोलिसांसमोर जबाब नोंदवला, ज्यामुळे पोलिसांचा तपास भक्कम झाला. आरोपी संजय हा टेकनपूर येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता आणि ड्रायव्हिंग देखील करायचा. घटनेच्या रात्री तो ज्या गाडीतून आला होता, ती गाडी देखील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी संजय रजक याला बेड्या ठोकल्या आहेत. आईच्या मायेला लाथ मारून केवळ अनैतिक संबंधांसाठी तिचा जीव घेणाऱ्या या नराधम मुलाच्या कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.









