पाचशे कोटींच्या आरोपावर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, हसत-हसत काय बोलून गेले?
मनोज जरांगेंनी जाहीर केलेल्या कथित ऑडिओ क्लिपनंतर राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. आता याविषयी श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जरांगेंचा ऑडिओ बॉम्ब
श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Shrikant Shinde On 500 Crore : मनोज जरांगे यांच्या ऑडिओ बॉम्ब नंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अडीच वर्षांपूर्वीची ही क्लिप बाहेर काढण्यामागे नेमका काय हेतू आहे याचं सत्य आम्ही बाहेर काढू असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल नागपुरात म्हटलं. तर आज भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत हे त्या ऑडिओ क्लिपचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव घेत पाचशे कोटी रुपयांचा उल्लेख करण्यात आला होता. याविषयी आता श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पत्रकारांनी याविषयी प्रश्न विचारताच श्रीकांत शिंदे यांनी यावर हसत-हसतच प्रतिक्रिया दिली. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊया.
'त्याच्याबद्दलच रिसर्च करतोय...'
शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना जरांगेंनी जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपबद्दल आणि 500 कोटी रुपयांबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला. याला उत्तर देताना ते म्हणाले की, 'त्याच्याबद्दलच रिसर्च करतोय दोन दिवस. संशोधन. की बाबा ज्याच्या कोणाकडे पाठवले होते पाचशे कोटी रुपये तो पण माझ्यापर्यंत पोहोचला नाही. जो जांगे पाटलांना प्रश्न पडला तो मला पडलाय. आणि आता तेच शोधायला चाललोय मी. आणि, आम्ही तीच चर्चा करत होतो इथे की पाचशे कोटी रुपये एकत्र कसे दिसतील? किती गाड्या लागतील?
हे ही वाचा : Marathwada Drought : दुष्काळाच्या भीषण झळा, अख्खं गाव झालं रिकामं
'मला कळलं तर मी सांगतो'
यापुढं बोलताना ते म्हणाले की, 'आता मला वाटतं त्याची शहानिशा जी आहे ती करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. कळेल काय ज्या गोष्टी आहेत त्या. गोवण्याचं काम केलं जातंय की काय?' यापुढं पत्रकारांना उद्देशून ते म्हणाले की, 'आता मला वाटतंय हे तुम्ही पण शोधताय ना? मी पण शोधतोय दोन दिवस. तेच करत होतो रिसर्च. आता तुम्ही पण शोधा. तुम्हाला कळलं तर तुम्ही सांगा मला कळलं तर मी सांगतो.'
हे ही वाचा : 'अंदाज चुकला..' गोकुळमधील पराभवानंतर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया
काय आहे प्रकरण?
जरांगेंनी दसरा मेळाव्यात 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचा उल्लेख करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीकास्त्र डागले होते. या पार्श्वभूमीवर भाजपच्या कॉन्फरन्स मीटिंगमधील असल्याचा दावा केला जाणारी एक कथित ऑडिओ क्लिप मनोज जरांगेंनी काल (22 ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत ऐकवली. क्लिपमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जरांगेंपर्यंत 500 कोटी पोहोचल्याचा दावा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. ('मुंबई तक' या क्लीपची पुष्टी करत नाही.)
