डॉक्टर, वकील, बिझनेसमन.. 500 हून अधिक महिला 'रोमान्स स्कॅम'च्या शिकार, नेमकं प्रकरण काय?
या चलाख गुन्हेगाराने आतापर्यंत 500 हून अधिक महिलांना 'हनीट्रॅप' आणि 'रोमान्स स्कॅम'चा शिकार बनवल्याचे तपासात उघड झाले असून, त्याच्या बँक खात्यांमध्ये 2 कोटी रुपयांहून अधिक संशयास्पद व्यवहार आढळून आले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
डॉक्टर, वकील, बिझनेसमन..
500 हून अधिक महिला 'रोमान्स स्कॅम'च्या शिकार
नेमकं प्रकरण काय?
Crime News : सोशल मीडिया आणि डेटिंग किंवा मॅट्रिमोनियल ॲप्सच्या माध्यमातून महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय रॅकेटचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नैऋत्य दिल्ली जिल्ह्याच्या सायबर पोलीस पथकाने पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा येथून 35 वर्षीय आनंद कुमार याला अटक केली आहे. या चलाख गुन्हेगाराने आतापर्यंत 500 हून अधिक महिलांना 'हनीट्रॅप' आणि 'रोमान्स स्कॅम'चा शिकार बनवल्याचे तपासात उघड झाले असून, त्याच्या बँक खात्यांमध्ये 2 कोटी रुपयांहून अधिक संशयास्पद व्यवहार आढळून आले आहेत.
अश्लील व्हिडिओ मिळवून पैशांची मागणी
आरोपी आनंद कुमार हा डेटिंग आणि मॅट्रिमोनियल साइट्सवर डॉक्टर, वकील, यशस्वी उद्योगपती किंवा फिल्म प्रोड्यूसर असल्याचे सांगून बनावट प्रोफाईल तयार करायचा. विशेषतः जोडीदाराच्या शोधात असलेल्या महिलांना तो लक्ष्य करत असे. महिलांचा विश्वास संपादन केल्यानंतर, तो त्यांच्याकडून खाजगी फोटो आणि अश्लील व्हिडिओ मिळवायचा. एकदा का हे साहित्य हाती आले की, तो आपले खरे रूप दाखवून ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी द्यायचा आणि महिलांकडून लाखो रुपये उकळायचा. आरोपी एकाच वेळी अनेक महिलांशी संपर्क ठेवून ही फसवणूक करत असे.
हे ही वाचा : नाशिक पुन्हा हादरले! दारु पाजून तरुणीवर लैंगिक अत्याचार, 'गजवा-ए-हिंद'चा उल्लेख केल्याचा आरोप
मृत्यूची खोटी बातमी
या प्रकरणाचा खुलासा एका पीडित महिलेच्या तक्रारीनंतर झाला. आरोपीने 'वैभव अरोरा' नावाच्या बनावट इन्स्टाग्राम आयडीवरून या महिलेशी संपर्क साधला आणि लग्नाचे आमिष दाखवले. विश्वास बसवावा यासाठी त्याने 'आनंद' नावाच्या एका बनावट मित्राची ओळखही करून दिली. त्यानंतर आजारपण आणि व्यवसायात तोटा झाल्याचे कारण सांगून त्याने पीडितेकडून 7 लाख रुपये उकळले. जेव्हा महिलेने पैशांची मागणी केली, तेव्हा आरोपीने स्वतःच्याच (वैभवच्या) मृत्यूची खोटी बातमी पसरवून संपर्क तोडून टाकला. या तक्रारीनंतर पोलीस उपायुक्त अमित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा छडा लावला.
हे ही वाचा : थारचा अपघात झाला नव्हता, मेहुणा आणि मेहुणीच्या अफेअरमुळे झालं खुनी कांड, कसा झाला खुलासा?
ऑनलाईन गेमिंग आणि चैनीची जीवनशैली
दिल्ली पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये छापा टाकून आनंद कुमारला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 4 स्मार्टफोन, 8 सिमकार्ड, 3 डेबिट कार्ड आणि फसवणूकीच्या पैशातून खरेदी केलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. चौकशीदरम्यान त्याने कबूल केले की, तो फसवणुकीतून मिळालेला पैसा ऑनलाईन गेमिंग आणि चैनीच्या जीवनशैलीवर खर्च करत असे. आरोपीवर यापूर्वीही दिल्ली आणि गाझियाबादमध्ये सायबर गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे सोशल मीडियावरील फसवणुकीचे एक मोठे जाळे उध्वस्त झाले असून, पोलिसांनी महिलांना अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.









