गरब्यात तलवार कोयत्यांची दहशत, राजन दुबेला पोलिसांची नोटीस
Kalyan crime news : कल्याण ग्रामीण परिसरातील गरबा कार्यक्रमात कोयत्यासारखी धारदार शस्त्रे दाखवून दहशत निर्माण केल्याच्या प्रकरणाला आता एक वेगळे वळण प्राप्त झाले आहे. या प्रकरणातील फरार असलेल्या आरोपींचा शोध घेताना पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप राजन दुबे, कौशल झा आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य व्यक्तींवर करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गरबा कार्यक्रमातील शस्त्रप्रदर्शनानंतर पोलिसांचा तपास
पोलिसांना शिवीगाळ आणि धमक्यांचा आरोप
नोटिशीनंतर दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या
Kalyan Crime News : कल्याण ग्रामीण परिसरातील गरबा कार्यक्रमात कोयत्यासारखी धारदार शस्त्रे दाखवून दहशत निर्माण केल्याच्या प्रकरणाला आता एक वेगळे वळण प्राप्त झाले आहे. या प्रकरणातील फरार असलेल्या आरोपींचा शोध घेताना पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप राजन दुबे, कौशल झा आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य व्यक्तींवर करण्यात आला आहे. या प्रकरणात राजन दुबेला पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी टिटवाळा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव यांची ठाणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. त्यामुळे या बदल्यांवरून परिसरात या चर्चांना उधाण आले. मात्र, बदल्यांचा संबंधित प्रकरणाशी संबंध नसल्याचे ठाणे ग्रामीणचे पोलीस अइधीक्षक विनयकुमार राठोड यांनी स्पष्ट केलं केल्याची माहिती दिली.
हे ही वाचा : सुनेत्रा पवार राज्याच्या अर्थमंत्री होणार? राष्ट्रवादीची बैठक अन् फडणवीसांच्या भेटीगाठी; काय घडतंय?
गरबा कार्यक्रमातील शस्त्रप्रदर्शनानंतर पोलिसांचा तपास
कल्याणमध्ये गरब्याच्या कार्यक्रमात काही तरुणांनी कोयत्यासारखी धारदार शस्त्रे दाखवत दोन जणांना बेदम मारहाण केल्याचा तसेच धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी महेश जैस्वार आणि आयुष पांडे यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले. तर प्रत्युष जाधव, विनायक माधने, रोशन चौघरी आणि दीपेश लोखंडे आणि इतर अन्य संशयितांचा शोध घेण्यात आला.
या गुन्ह्याचा पुढील तपास करताना, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब अशोक गायकवाड आणि त्यांच्या पथकाला फरार आरोपी प्रत्युष जाधव, विनायक माधने आणि रोशन चौधरी हे म्हारळपाडा येथील कौशल हिरानंद झा यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली असे तक्रारीत नमूद केले. त्यानुसार 20 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास पोलीस पथक कांबा गावाच्या हद्दीतील महाराजा चहावाल्याजवळ पोहोचले. तेथे कौशल झा आढळल्यानंतर पोलिसांनी त्याची ओळख करून देत संबंधित गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी सुरू केली.
‘तुम्हाला महागात पडेल’ पोलिसांना धमकी दिल्याचा आरोप
पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब गायकवाड यांच्या तक्रारीनुसार, चौकशीदरम्यान कौशल झा याने उडवाउडवीची उत्तरे देत पोलिसांना त्रास देत असल्याचा आरोप केला आणि त्यानंतर आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी हॉटेलमध्ये उपस्थित असलेले सुमारे 20 ते 25 जण पोलिसांच्या जवळ जमा झाले. यापैकी राजन दुबे याने आपण एका मोठ्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे सांगत, ‘तुम्हाला हे सर्व महागात पडेल,’ अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर राजन दुबे याच्यासोबत असलेल्या व्यक्तींनी पोलिसांशी आरडाओरडा आणि धक्काबुक्की केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी आपण सरकारी कर्तव्य बजावत असून गुन्ह्याचा तपास करत असल्याचे स्पष्ट केले, तरीही संबंधितांनी विरोध सुरू ठेवल्याचा आरोप आहे. त्यानंतर कौशल झा याला पुढील चौकशीसाठी पोलिसांच्या खासगी वाहनातून कल्याण तालुका पोलीस ठाण्यात नेण्यात येत होते.
पोलिसांना शिवीगाळ आणि धमक्यांचा आरोप
कौशल झा याला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना राजन दुबे आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तींनी चारचाकी व दुचाकी वाहनांवरून पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, वाहनात असलेल्या कौशल झा याने पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी कुणाल बावदाणे आणि धनंजय गुजर यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. तसेच स्वतःला जखमी करण्याच्या उद्देशाने वाहनाच्या सीटवर डोके आपटण्याचा प्रयत्न करत ‘तुमची नोकरी घालवितो, तुम्हाला पाहतो,’ अशा धमक्या दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या घटनेप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब अशोक गायकवाड यांच्या फिर्यादीवरून कौशल हिरानंद झा, राजन दुबे आणि त्यांच्यासोबत असलेल्या 20 ते 25 अनोळखी व्यक्तींविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हे ही वाचा : Astrology : आज कोजागिरी पौर्णिमा, 'या' राशींना होणार लाभ
नोटिशीनंतर दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या
या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव यांनी बुधवारी राजन दुबे याला पोलीस ठाण्यात हजर राहण्याबाबत नोटीस बजावली होती. त्यानंतर गुरुवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव यांची ठाणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. नोटीस बजावल्यानंतर लगेचच झालेल्या या बदल्यांमुळे त्यामागील कारणांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, बदल्या आणि गरबा शस्त्रप्रकरणातील तपास यांचा परस्पर संबंध असल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
