ग्रामपंचायत कार्यालयात माजी सैनिकावर कुऱ्हाडीने वार, मुलीलाही निर्घृणपणे संपवलं
बेळगावमध्ये एका माजी सैनिक आणि त्याच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे. जमिनीच्या वादावरुन झालेल्या वादातून ही घटना घडली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ग्रामपंचायतीत रक्तरंजित कांड,
माजी सैनिकाची हत्या
मुलीलाही निर्घृणपणे संपवलं
Crime News : कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बुधवारी (16 सप्टेंबर) एका माजी सैनिकाची आणि त्यांच्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. 67 वर्षीय रुद्रप्पा कुंदरगी आणि त्यांची 26 वर्षीय मुलगी शशिकला कुंदरगी असे या दुर्दैवी मृतांची नावे आहेत. मालमत्तेच्या वाटणीसाठी रुद्रप्पा आपल्या मुलीसह ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी आले असतानाच ही थरारक घटना घडली. या हल्ल्यात रुद्रप्पा यांच्या कारचा चालकही गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भावांच्या हिश्शावर दावा
मिळालेल्या माहितीनुसार, रुद्रप्पा हे जमिनीच्या कागदपत्रांची नोंदणी करण्यासाठी धारवाडहून भाड्याच्या कारने गावात आले होते. ते ग्रामपंचायत कार्यालयात आल्याचे समजताच त्यांचे भाऊ बसप्पा कुंदरगी, संगप्पा कुंदरगी आणि पुतण्या मडीवाळप्पा कुंदरगी यांनी तेथे धाव घेतली. 38 गुंठे जमिनीच्या वाटणीवरून रुद्रप्पा आणि त्यांच्या भावांमध्ये आधीपासूनच न्यायालयात वाद सुरू होता.
हे ही वाचा : तरुणीने दिलेला नकार पचवता येईना, अरबाजने थेट घरात पेट्रोल बॉम्ब फेकला
कुऱ्हाडीने वार करत संपवलं
न्यायालयाने या जमिनीचे तीन भाग करण्याचे आदेश दिले होते, मात्र रुद्रप्पा यांनी आपल्या हिश्शाची जमीन आधीच विकली होती आणि उर्वरित जमिनीवरही त्यांनी हक्क सांगून न्यायालयात दावा दाखल केला होता. ही संपूर्ण मालमत्ता रुद्रप्पा यांच्या नावावर असल्याने आणि त्यांनी भावांच्या हिश्शावरही दावा ठोकल्याने दोन्ही भाऊ प्रचंड संतप्त झाले होते. याच रागातून तिन्ही आरोपींनी कुऱ्हाड आणि विळ्यासारख्या धारदार शस्त्रांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारातच रुद्रप्पा आणि शशिकला यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला असून हल्ल्यादरम्यान शशिकला यांचे केसही कापण्यात आल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा : सांगली पटवर्धन घराण्याच्या वारशाचा वाद पेटला, मैनै प्यार किया फेम भाग्यश्रीने काय केलं?
आरोपी फरार
घटनेची माहिती मिळताच बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, तर फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. कित्तूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. दुहेरी हत्येमागचे अचूक कारण स्पष्ट करण्यासाठी तपासाला गती देण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
