आयफोनसाठी 13 वर्षीय नात झाली क्रूर, प्रियकरासोबत मिळून आजोबांना संपवलं
एका 13 वर्षीय मुलीने प्रियकरासोबत मिळून आपल्या आजोबांची हत्या केली आहे. केरळमधील ही घटना असून पोलीस तपासात धक्कादायक कारण उघड झाले आहे. नेमकं काय घडलं, जाणून घ्या सविस्तर.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आयफोनसाठी 13 वर्षीय नात झाली क्रूर
प्रियकरासोबत मिळून आजोबांना संपवलं
Crime News : एका 13 वर्षीय मुलीने आपल्या अल्पवयीन प्रियकरासह आणि त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने 67 वर्षीय आजोबांची क्रूर हत्या केली. सोन्याचे दागिने आणि पैशांसाठी हा कट रचण्यात आला असून, या गुन्ह्यातून मिळालेल्या पैशातून मुलीला आयफोन आणि तिच्या प्रियकराला टू-व्हीलर खरेदी करायची होती. मुलीच्या सांगण्यावरून तिच्या प्रियकराने व त्याच्या मित्रांनी सिनेमा स्टाईलने हा खून केला. केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यातील ही घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक समस्या आणि सिनेमांचा प्रभाव यामुळे हा प्रकार घडला.
व्हिडीओ कॉलवर पाहिली हत्या
या गुन्ह्यामागे आजोबांनी मोबाईल वापरण्यावर आणि मुलांशी मैत्री करण्यावर घातलेल्या बंधनांचा राग आणि साडेचार तोळे सोन्याचे दागिने लुटणे हा उद्देश होता. मुलीने यापूर्वी आजोबांवर खोटे आरोप केले होते आणि त्यांना संपवण्यास सांगितले होते. घटनेच्या दिवशी, घरातील इतर महिला रुग्णालयात गेल्यावर, मुलीने आजोबांना आपण मैत्रिणीच्या घरी अभ्यासासाठी जात असल्याचे सांगून घर सोडले. त्यानंतर रात्रीच्या सुमारास आरोपींनी खिडकीतून घरात प्रवेश करून आजोबांना बांधले आणि मारहाण करत त्यांची हत्या केली, तर मुलगी व्हिडिओ कॉलवर हा सर्व प्रकार पाहत होती.
हे ही वाचा : 'आतमध्ये दारुच्या बाटल्या', अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे कार चालवली, 2 महिलांना चिरडलं
चोरीचा बनाव अन् जबाबात विसंगती
खून केल्यानंतर केवळ चोरीचा बनाव भासवण्यासाठी आरोपींनी घरात मिरचीची पूड पसरवली. घटनेनंतर मुलीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खोटी माहिती आणि बनावट जबाब दिला, मात्र तिच्या कथनात सतत विसंगती आढळल्याने पोलिसांचा तिच्यावर संशय बळावला. पोलिसांनी मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि सायबर सेलच्या मदतीने तपास चक्रे वेगाने फिरवली आणि मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे अवघ्या 24 तासांत अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले.
हे ही वाचा : मुंबई : सासूने घरगड्यालाच दिली सुनेची सुपारी, क्रूर हत्याकांडाचा कसा झाला उलगडा?
अल्पवयीन आरोपींचं काय होणार?
पोलिसांनी या प्रकरणी चोरीला गेलेला सोन्याचा ऐवज जप्त केला असून, एका सोन्याच्या अंगठीची विक्री करणाऱ्या व्यक्तीचीही ओळख पटवली आहे. या सर्व अल्पवयीन आरोपींना आता बाल न्याय मंडळासमोर (Juvenile Justice Board) सादर केले जाणार आहे.
