आधी वडिलांनी गर्लफ्रेंडच्या नावावर केली जमीन, नंतर घरात आढळले तीन सडलेले मृतदेह
एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एकाच घरातून एकामागून एक तीन कुजलेले मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मध्यप्रदेशातील 'या 'ट्रिपल मर्डर'च्या गुंतागुंतीच्या गुन्ह्याने पोलिसांचीही झोप उडवली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आधी वडिलांनी गर्लफ्रेंडच्या नावावर केली जमीन
नंतर घरात आढळले तीन सडलेले मृतदेह
Crime News : एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एकाच घरातून एकामागून एक तीन कुजलेले मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या 'ट्रिपल मर्डर'च्या गुंतागुंतीच्या गुन्ह्याने पोलिसांचीही झोप उडवली आहे. प्राथमिक तपासात हे प्रकरण कोट्यवधी रुपयांच्या जमिनीचा वाद आणि लिव्ह-इन रिलेशनशिपशी संबंधित असल्याचे दिसून येत आहे. मृत ओमप्रकाश शर्मा (वय 56) आणि गिंदा बाई (वय 45) हे दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. ओमप्रकाश शर्मा हे या जमिनीचे मालक होते, परंतु पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांची दोन्ही मुले घर सोडून निघून गेली होती. एकटेपणामुळे ओमप्रकाश हे गिंदा बाई नावाच्या महिलेसोबत लिव्ह-इनमध्ये राहू लागले होते. मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील ही घटना आहे.
एकामागून एक तीन सडलेले मृतदेह...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश आणि गिंदा बाई या दोघांनाही दारूचे व्यसन होते आणि त्यांच्या घरी अनेक लोक दारू पिण्यासाठी येत असत. 18 जूनच्या सुमारास ओमप्रकाश आणि गिंदा बाई हे एका तिसऱ्या व्यक्तीसोबत घरी दारू पीत होते. दारू प्यायल्यानंतर या तिघांचेही मृतदेह चार दिवसांनी एकाच घरातील दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बंद अवस्थेत आढळले. 21 जून रोजी पोलिसांना संबंधित घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले, तेव्हा आत घरमालक ओमप्रकाश यांचा मृतदेह पडलेला आढळला. पोलिसांनी तात्काळ तो मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र, ज्या खोलीतून ओमप्रकाश यांचा मृतदेह मिळाला, त्याच्या शेजारच्या खोलीत आणखी दोन मृतदेह पडले आहेत, याची कल्पना सुरुवातीला पोलिसांनाही आली नाही.
हे ही वाचा : पुणे : किल्ल्यावरुन सेल्फी काढताना पडला नाही, होणाऱ्या बायकोने गेम केल्याचा संशय अन्...
राष्ट्रीय महामार्गालगत जमीन अन्...
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच 22 जून रोजी पोलिसांना पुन्हा एकदा त्याच घरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी घरात जाऊन सखोल तपास केला असता, तिथले दृश्य पाहून त्यांचे धाबे दणाणले. शेजारच्या खोलीत महिला गिंदा बाई आणि एका अज्ञात तरुणाचा मृतदेह बंद अवस्थेत आढळून आला. मृतदेह अतिशय वाईट पद्धतीने कुजल्यामुळे निर्माण झालेल्या तीव्र दुर्गंधीमुळे पोलिसांना ते मृतदेह उचलण्यातही प्रचंड अडचणी आल्या. या खळबळजनक प्रकरणात एकामागून एक तीन मृतदेह सापडल्याने आता ही हत्याच असल्याचा पोलिसांचा संशय बळावला आहे. तपासात समोर आले आहे की, मृत ओमप्रकाश शर्मा यांच्याकडे राष्ट्रीय महामार्गालगत अत्यंत मौल्यवान जमिनी आणि भूखंड होते. ओमप्रकाश यांनी आपल्या लिव्ह-इन पार्टनरच्या नावावरही एका भूखंडाची नोंदणी केली होती, ज्यामुळे त्यांचे दोन्ही मुलगे त्यांच्यावर प्रचंड नाराज होते. 18 जून रोजी नेमके काय घडले की तिघांचीही एकत्र हत्या करण्यात आली, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
हे ही वाचा : Inside Story : निधीची बोंबाबोंब करणाऱ्या 'त्या' 6 खासदारांनी तुमची किती कामे केली?
आरोपी कोण?
एकीकडे या घटनेनंतरही ओमप्रकाश यांचे दोन्ही मुलगे आपल्या वडिलांना पाहण्यासाठी गुना येथे पोहोचले नाहीत, तर दुसरीकडे मृत महिला गिंदा बाई यांच्या मुलीचे रडून रडून हाल झाले आहे. गिंदा बाई यांच्या मुलीने सांगितले की, माझ्या आईची अचानक त्यांची अशी निर्घृण हत्या कशी झाली, हे तिला समजू शकत नाहीये. या प्रकरणावर माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ओमप्रकाश शर्मा यांचा मृतदेह मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी गिंदा बाई आणि त्यांच्या मानलेल्या दिराचा मृतदेहही घराच्या आतून जप्त करण्यात आला आहे. सर्व मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होते. या प्रकरणाच्या तपासासाठी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाची मदत घेतली जात असून, लवकरच या तिहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश केला जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.









