Mira Road Murder : मनोज साने आणि सरस्वती वैद्यने केले होते लग्न?
सरस्वती वैद्य हिच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मनोज साने (56) याने तिच्याशी लग्न केले होते, परंतु दोघांनीही ही गोष्ट लपवून ठेवली होती. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
ADVERTISEMENT

Mira Road Live In Partner Murder : मीरा रोड भागात घडलेल्या घटनेने महाराष्ट्रच नव्हे तर देशही हादरला. लिव्ह इन पार्टनरची मनोज साने याने हत्या केली आणि नंतर तुकडे करून शिजवले, ते कुत्र्यांना खाऊ घातले. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून, महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. यात त्यांनी लग्न केल्याबद्दलही महत्त्वाची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सरस्वती वैद्य हिच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मनोज साने (56) याने तिच्याशी लग्न केले होते, परंतु दोघांनीही ही गोष्ट लपवून ठेवली होती. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, मनोज साने याने पोलिसांना सांगितले की, सरस्वती वैद्य हिने विष प्राशन करून आत्महत्या केली. आपण केवळ शरीराचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता.
हेही वाचा >> किचनमधली दृश्य पाहून पोलिसांचीही तंतरली, मीरा रोड हत्याकांडाची FIR जशीच्या तशी!
मुंबईच्या बाहेरील मीरा रोड (पूर्व) परिसरातून गुरुवारी अटक करण्यात आलेल्या मनोज सानेने चौकशीदरम्यान हेही सांगितले की, तो एचआयव्ही बाधित आहे आणि 36 वर्षीय वैद्य हिच्याशी त्याचे कधीही शारीरिक संबंध ठेवले नाही, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
दोघांनीही लग्नाची नोंदणी केली नाही
मयत सरस्वती वैद्यच्या तीन बहिणींच्या जबाबाचा दाखला देत मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी याप्रकरणात महत्त्वाची माहिती दिली. बजबळे म्हणाले, “या जोडप्याने त्यांच्या लग्नाची नोंदणी केली नाही, परंतु त्यांनी मंदिरात विधीनुसार लग्न केले होते.” त्यांनी पुढे सांगितले की, ” वैद्य यांनी त्यांच्या बहिणींना लग्नाबाबत सांगितले होते, मात्र त्या दोघांच्या वयात खूप अंतर असल्याने त्यांनी लग्नाची गोष्ट कुणालाही सांगितली नाही.”