राजघराण्यातील व्यक्तीने दोन बायका केल्या, एकीने दुसरीवर गोळ्या झाडल्या
MP Crime News : मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील परसमनिया गढीमध्ये कौटुंबिक वादातून झालेल्या गोळीबारात रूपेंद्र सिंह यांची पत्नी योगिता सिंह गंभीर जखमी झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राजघराण्यातील व्यक्तीने दोन बायका केल्या
एकीने दुसरीवर गोळ्या झाडल्या
MP Crime News : मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील परसमनिया गढी येथे 12 जून रोजी दुपारी एक खळबळजनक घटना घडली. राजघराण्यातील जुना कौटुंबिक वाद हिंसक वळणावर पोहोचला. नागौद राजघराण्याशी संबंधित रूपेंद्र सिंह उर्फ बाबा राजा यांची पत्नी योगिता सिंह आणि त्यांची कथित दुसरी पत्नी सुनीता सिंह यांच्यात दीर्घकाळापासून वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी योगिता सिंह आपल्या नातेवाईकांसह गढीवर पोहोचल्या होत्या. मात्र, चर्चेदरम्यान परिस्थिती अचानक बिघडली आणि वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाले. यामध्ये योगिता सिंह यांच्या पोटात गोळी लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
राजघराण्यातील अंतर्गत कलहाने परिसरात खळबळ
घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी योगिता सिंह यांना तत्काळ उपचारासाठी रीवा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करून पोटात अडकलेली गोळी बाहेर काढली. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते. पीडितेच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, ही घटना अचानक घडलेली नसून, ती पूर्वनियोजित कटकारस्थानाचा भाग असू शकते. या घटनेने परसमनिया गढीच्या शांततेचा भंग केला असून, राजघराण्यातील या अंतर्गत कलहाने संपूर्ण परिसरात भीती आणि चर्चेचे वातावरण निर्माण केले आहे.

हेही वाचा : पत्नीचं अफेअर असल्याचा संशय, पतीने सोशल मीडियावर 'तसले' व्हिडीओ टाकले









