मुंबई : किनाऱ्यावर अडकलेल्या जहाजात चार मृतदेह सापडल्याने खळबळ, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

मुंबईजवळ अडकलेल्या एका जहाजावर चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना चार जणांचा मृत्यू झाला. ही घटना आणि त्या जहाजाची पार्श्वभूमी यांबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

Abandoned Ship Tragedy
Abandoned Ship Tragedy
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मुंबई : किनाऱ्यावर अडकलेल्या जहाजात चार मृतदेह सापडल्याने खळबळ,

point

नेमकं काय घडलं?

Abandoned Ship Tragedy : मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील गोराई-मनोरी किनारपट्टीवरुन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. याठिकाणी गेल्या चार महिन्यांपासून अडकून पडलेल्या एका मोठ्या जहाजात चार जणांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे चौघे जहाजात चोरीच्या उद्देशाने शिरले होते आणि त्यावेळी झालेल्या गॅस गळतीमुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन आणि पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल.

दरम्यान, चार महिन्यांपासून अडकलेल्या या जहाजाच्या मालकावर आधीपासूनच गुन्हा दाखल असून तो सध्या परदेशात फरार आहे. तसेच या जहाजाचा वापर बेकायदेशीर तेल व्यापारासाठी केला जात असल्याचा दावा समोर आला असून, पोलीस या दिशेनेही तपास करत आहेत.

दोनदा चोरी, तिसऱ्यांदा गेले अन्...

तपासादरम्यान या जहाजावर यापूर्वीही चोरीच्या दोन घटना घडल्याचे निष्पन्न झाले आहे. पहिल्या वेळी चोरांनी जहाजातून सुमारे अडीच लाख रुपयांचे सामान चोरले होते, तर दुसऱ्या वेळी सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज लांबवल्याचा दावा केला जात आहे. यानंतर तिसऱ्यांदा चोरी करण्याच्या इराद्याने सुमारे आठ जणांची टोळी स्पीडबोटच्या साहाय्याने जहाजापर्यंत पोहोचली होती. त्यापैकी एक जण स्पीडबोटवरच थांबला, तर उर्वरित सात जण जहाजाच्या आत शिरले होते.

हे ही वाचा : 'अजितदादांच्या घातपात प्रकरणी VSR ला वाचवणारा मफलरवाला नेता राज्यातीलच', रोहित पवारांचा प्रचंड मोठा गौप्यस्फोट

विषारी वायूमुळे मृत्यू?

जहाजात शिरलेल्या सात जणांपैकी चौघे जण आतील भागातील पाईप कापण्यासाठी गेले होते. याच दरम्यान जहाजाच्या आत गॅस गळती झाली किंवा ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली. यामुळे विषारी वायू अथवा गुदमरल्यामुळे या चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच गोराई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेचे गांभीर्य ओळखून नौदलाला पाचारण करण्यात आले. नौदलाच्या मदतीने जहाजात अडकलेले चारही मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.