सांगलीत खून का बदला खून? तरुणाची कोयत्याने वार करुन निर्घृण हत्या; CCTV फुटेज व्हायरल
सांगलीत एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सांगलीत खून का बदला खून?
तरुणाची कोयत्याने वार करुन निर्घृण हत्या
नेमकं काय घडलं?
Sangli Crime, स्वाती चिखलीकर : सांगली शहरातील गोकुळनगर परिसरात एका तरुणाची चाकू आणि कोयत्याने वार करुन अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. गौरव सर्जे असे या मृत तरुणाचे नाव असून या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. भरदिवसा घडलेल्या या थरारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.
सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
या संपूर्ण घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फुटेजवरून हल्ल्याची भयावहता आणि तीव्रता स्पष्टपणे दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची (LCB) पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी परिसराची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्या आधारे संशयित हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांचा कसून शोध सुरू केला आहे.
हे ही वाचा : Mumbai Adivasi Student Protest | पोलिसांनी ताब्यात घेतलं? नेमकं काय घडलं?
'खून का बदला खून?'
या हत्येमागे पूर्ववैमनस्य आणि 'खून का बदला खून' अशी पार्श्वभूमी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुमारे दीड महिन्यापूर्वी घडलेल्या एका खून प्रकरणात 'मकोका' (MCOCA) अंतर्गत कारवाई झालेला मुख्य आरोपी हा मृत गौरव सर्जेचा भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे जुन्या वादातून किंवा सूडबुद्धीतून हा हल्ला करण्यात आला आहे का, या दिशेने पोलीस सध्या गांभीर्याने तपास करत आहेत.
हे ही वाचा : परभणी : कर्जाचा डोंगर, दुष्काळाचा फटका, कुटुंब रस्त्यावर आलं, मिरखेल गावात काय घडलं?
परिसरात तणाव
सध्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे गोकुळनगर आणि आसपासच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी नागरिकांना शांतता बाळगण्याचे तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
