पुणे : टीव्ही बंद करुन माझ्या डोळ्यात ड्रॉप टाक, वडिलांनी काम सांगताच मुलगा संतापला; जन्मदात्याला संपवलं
Pune Crime : किरकोळ वादातून मुलाने जन्मदात्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीये.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वडिलांनी काम सांगताच मुलगा संतापला

स्वयंपाकघरातील चाकू घेऊन थेट आपल्या वडिलांवर वार
पुणे : कोथरूड परिसर पुन्हा एकदा हत्या प्रकरणामुळे हादरला आहे. दसऱ्यासारख्या सणाच्या दिवशी जय भवानी नगर येथे मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांचा खून केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव तानाजी पायगुडे असे असून आरोपी मुलगा सचिन तानाजी पायगुडे (वय 35) याला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. तानाजी यांच्या पत्नी सुमन पायगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
वडिलांनी काम सांगितल्याचा राग, मुलाने बापाला संपवलं
पोलिसांच्या माहितीनुसार, पायगुडे कुटुंब जय भवानी नगरमधील चाळ क्रमांक 2 येथे राहते. दसऱ्याच्या दिवशी दुपारी साडेबारा वाजता सचिन घराच्या माळ्यावर टीव्ही पाहत बसला होता. त्यावेळी वडील तानाजी यांनी त्याला टीव्ही बंद करून डोळ्यात ड्रॉप टाकायला सांगितले. या किरकोळ कारणावरून वडील-मुलामध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यानंतर सचिनचा राग अनावर झाला आणि त्याने स्वयंपाकघरातील चाकू घेऊन थेट आपल्या वडिलांवर वार केले. तोंड आणि गळ्यावर झालेल्या वारांमुळे तानाजी यांचा जागीच मृत्यू झाला.
दसऱ्याच्या दिवशीच मुलाने केला बापाचा खून
ही धक्कादायक घटना घडताच कोथरूड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी मुलगा सचिनला ताब्यात घेतले. त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दसरा सणाच्या दिवशी घरात आनंदाचे वातावरण असताना एका किरकोळ कारणावरून मुलानेच वडिलांचा जीव घेतल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांचा तपास सुरू आहे.