Pune, MPSC: राहुलसोबत लग्नाला नकार, दर्शना पवारच्या कुटुंबीयांनी नव्हे तर…
MPSC परीक्षेत यश मिळविणाऱ्या दर्शना पवार हिच्या हत्येप्रकरणी एक नवी माहिती समोर आली आहे. दर्शना पवार हिने नकार दिल्याने राहुल हांडोरे याने तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

Pune Crime News: पुणे: MPSC परीक्षेत (MPSC Exam) राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार (Darshana Pawar) या 26 वर्षीय तरुणीच्या हत्येने अवघा महाराष्ट्र हादरून गेला आहे. स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळविल्यानंतर अवघ्या काही दिवसातच तिची राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी निर्घृण हत्या करण्यात आली. ज्या प्रकरणी तिच्या लहानपणीचा मित्र राहुल हांडोरे (Rahul Handore) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अटकेनंतर आता नवनवी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. ज्यानुसार राहुलने दिलेला लग्नाचा प्रस्ताव धुडकावल्याने तिची हत्या (Murder) करण्यात आल्याचं पोलिसांनी यावेळी सांगितलं. मात्र, दोन दिवसांपूर्वी अशी माहिती समोर आली होती की, दर्शनाच्या कुटुंबीयांनी राहुलसोबत लग्न लावून देण्यास नकार दिला होता. पण आता याबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. (pune mpsc darshana pawar rahul handore rejection of marriage proposal murder crime)
राहुलला लग्नासाठी कोणी नकार दिला होता?
पुणे ग्रामीणचे एसपी अंकित गोयल यांनी काल (22 जून) या हत्येप्रकरणी पत्रकार परिषद घेतली होती. ज्यामध्ये त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला. आरोपी राहुल हांडोरे आणि दर्शना पवार हे एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. त्यामुळेच दर्शना त्याच्यासोबत बाइकने राजगडावर ट्रेकसाठी गेली होती. पण इथेच त्याने तिची निर्घृणपणे हत्या केली.
मात्र, या हत्येमागचं खरं कारण म्हणजे लग्नासाठी दिलेला नकार होता. खरं तर राहुल हांडोरे आणि दर्शना हे लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. त्यामुळेच राहुलचा जीव दर्शनावर जडला होता. खरं तर दोघेही आपल्या करिअरबाबत खूपच सजग होते. त्यामुळे दोघेही MPSC सारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. असं असताना दर्शना हिने नुकतंच या परीक्षेत यश मिळावलं. पण राहुलला अपयश आलं.
असं असतानाच राहुलला असं वाटू लागलं की, त्याचं दर्शनासोबत लग्न व्हावं. याच गोष्टीची विचारणा करण्यासाठी राहुल दर्शनाला राजगडाच्या पायथ्याशी घेऊन गेला होता.









