Pune Accident: पुणे अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट, ससून रुग्णालयातला एक कर्मचारी गायब
Pune Porsche Car Accident : पुणे पोलिसांच्या या कारवाईनंतर रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी गायब झाला होता. हा कर्मचारी सध्या नॉटरिचेबल असल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलीस या कर्मचाऱ्याचा शोध घेत आहे.
ADVERTISEMENT

Pune Porsche Car Accident : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Accident) दररोज नव-नवे खुलासे समोर येत आहेत. सोमवारी याच प्रकरणात ससून रूग्णालयातील (Sassoon Hospital) दोन डॉक्टरांनी बिल्डरपुत्राचे रक्ताचे नमुने अदलाबदल केल्याची माहिती उघड झाली होती. असे असताना आता ससून रुग्णालयातील रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. या कर्मचाऱ्याचा शोध आता पोलीस घेत आहेत. (pune porsche accident news sassoon hospital blood test department employee absconded builder vishal agarwal)
पुण्यातील कल्याणीनगर भागात बिल्डरपुत्राने पोर्शे कारने दोन जणांना चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले होते. मंद्यधुंद अवस्थेत अल्पवयीन मुलाकडून हे कृत्य घडल्याने पोलिसांनी त्याला रक्त चाचणीसाठी ससून रूग्णालयात पाठवले होते. मात्र ससून रूग्णालयात केलेल्या रक्त चाचणीत आरोपीने अल्कोहोल न घेतल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या प्रकरणात रक्ताचे नमुने बदलल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. त्यामुळे पोलिसांनी चौकशी करून डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळणोर या दोन डॉक्टरांसह शिपाई अतुळ घटकांबळे यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती.
हे ही वाचा : बिल्डरच्या तालावर नाचली व्यवस्था, पुण्यात यंत्रणेची लक्तरं..
पुणे पोलिसांच्या या कारवाईनंतर रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी गायब झाला होता. हा कर्मचारी सध्या नॉटरिचेबल असल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलीस या कर्मचाऱ्याचा शोध घेत आहे. यासाठी पोलिसांनी ससून रूग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे. त्यानंतर रक्त चाचणी विभागाच्या परिसरात असणाऱ्या व्यक्तींची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या सर्व संबंधितांना आम्ही चौकशीसाठी बोलावणार आहोत. जो कर्मचारी चौकशीला येणार नाही, त्याला जबरदस्तीने आणले जाईल, अशी माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिली आहे.
दरम्यान आता ससून रूग्णालयातला हा कर्मचारी का गायब झाला आहे? त्याचा या प्रकरणात काय सहभाग आहे. याचा तपास आता पोलीस करतायत.










