पत्नीने दोन प्रियकरांच्या मदतीने केली पतीची हत्या; आधी दारू पाजली, नंतर गळा आवळला
Telangana Crime News : तेलंगणातील कामारेड्डी येथे 25 वर्षीय महिलेने दोन प्रियकरांच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. दारू पाजून गळा आवळल्यानंतर मृतदेह तलावात फेकण्यात आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नीने दोन प्रियकरांच्या मदतीने केली पतीची हत्या
आधी दारू पाजली, नंतर गळा आवळला
Crime News : तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात अनैतिक संबंधांतून पतीच्या हत्येचा प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीने दोन प्रियकरांच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा आरोप असून, तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. अनैतिक संबंधांतून एका 25 वर्षीय महिलेने आपल्या दोन प्रियकरांच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. या तिघांनी आधी पतीला दारू पिण्याच्या बहाण्याने घराबाहेर बोलावले. त्यानंतर तो दारूच्या नशेत असताना नायलॉनच्या दोरीने गळा आवळून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तलावात फेकून दिला. सुरुवातीला ही घटना अपघाती मृत्यू असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांच्या तपासात संपूर्ण प्रकार उघड झाला. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या दोन प्रियकरांना अटक केली आहे.
हेही वाचा : Govt Jobs : भारत सरकारच्या कंपनीत ड्रायव्हरसह विविध पदांसाठी भरती, महिन्याला 70 हजार रुपयांपर्यंत पगार
दोन तरुणांशी प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर
मृत व्यक्तीचे नाव गुम्माडी काशीराम (26) असे आहे. तो तेलंगणातील बांसवाडा मंडळातील हनमाजीपेट गावचा रहिवासी होता. तो रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. 23 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री गावाच्या बाहेरील भागात असलेल्या पचेरा चेरुवु तलावात त्याचा मृतदेह आढळला. सुरुवातीला पोलिसांनी काशीरामच्या संशयास्पद मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. काशीरामचे वडील चकाली भुमैया यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवाल आणि प्राथमिक तपासात समोर आलेल्या बाबींमुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हत्येच्या दिशेने सुरू केला. तपासादरम्यान काशीरामची पत्नी 25 वर्षीय गुम्माडी सविता हिचे गावातील दोन तरुणांशी प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. चिंताकिंडी रामू (26) आणि पसुपूला संतोष (25) अशी या दोघांची नावे आहेत. पतीपासून सुटका करून घेण्यासाठी सविताने या दोघांच्या मदतीने हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.
तिघांनी काशीरामला दारू पिण्याच्या बहाण्याने सोबत नेले अन्..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 ऑक्टोबरच्या रात्री तिघांनी काशीरामला दारू पिण्याच्या बहाण्याने सोबत नेले. काशीराम दारूच्या नशेत पूर्णपणे असताना रामूने नायलॉनच्या दोरीने त्याचा गळा आवळला. यावेळी संतोषने काशीरामचे हात पकडून ठेवले होते. त्यामुळे त्याला प्रतिकार करून पळून जाण्याची संधी मिळाली नाही. गळा आवळल्याने काशीरामचा मृत्यू झाला. त्यानंतर तिघांनी त्याचा मृतदेह तलावात फेकून दिला. हा मृत्यू अपघात असल्याचे भासवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, पोलिसांच्या तपासात हत्येचा कट उघड झाला. या प्रकरणी 30 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी सविता, रामू आणि संतोष या तिघांना अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले मोबाइल फोन आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103, 238 आणि 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.
