Lok Sabha Election 2024: बाळासाहेबांचा 'धनुष्यबाण' कोकणातून हद्दपार...

रोहित गोळे

ADVERTISEMENT

बाळासाहेबांचा 'धनुष्यबाण' कोकणातून हद्दपार...
बाळासाहेबांचा 'धनुष्यबाण' कोकणातून हद्दपार...
social share
google news

Kokan and Bow and Arrow Symbol: रत्नागिरी-सिंधुदुर्ग: लोकसभा निवडणूक 2024 साठी (Lok Sabha Election 2024) महायुतीत अनेक जागांवरील तिढा हा अद्यापही कायम आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून ज्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून जो वाद सुरू होता तो आता अखेर मिटला आहे. या जागेसाठी शिवसेना (शिंदे गट) हा अतिशय आग्रही होती. मात्र, आज (18 एप्रिल) हा मतदारसंघ भाजपला गेल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण या मतदारसंघातून भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याच घोषणेनंतर हे मात्र, स्पष्ट झालं आहे की, लोकसभेच्या निवडणुकीत बाळासाहेबांचं धनुष्यबाण हे चिन्ह आता कोकणातून हद्दपार झालं आहे. (lok sabha election 2024 balasaheb thackeray shiv sena bow and arrow symbol will not be seen in Konkan this election know exact history cm eknath shinde)

ADVERTISEMENT

शिवसेना, धनुष्यबाण आणि कोकण यांचं कायमच जवळचं नातं होतं. कोकणाने आतापर्यंत अनेकदा बाळासाहेबांना साथ दिली होती. शिवसेनेचे अनेक खासदार हे कोकणातून लोकसभेवर गेले होते. पण ज्या धनुष्यबाण या चिन्हासाठी एकनाथ शिंदेंनी कायदेशीर लढा दिला होता तेच धनुष्यबाण चिन्ह हे आता कोकणातून हद्दपार झालं आहे. 

धनुष्यबाण हे चिन्ह जरी एकनाथ शिंदेंकडे असलं तरी महायुतीतील जागा वाटपामध्ये शिंदेंच्या वाटेला एकही जागा आलेली नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात धनुष्यबाण हे चिन्हच मतदारांना दिसणार नाही.

हे वाचलं का?

आजवर कोकणवासियांचं धनुष्यबाण या चिन्हाशी एक भावनिक नातं होतं. पण महायुतीत कोकणातील दोन्ही जागा या मित्र पक्षांना गेल्याने तिथे धनुष्यबाण हे चिन्ह नाही. अशावेळी कोकणातील मतदार नेमकं कोणाला साथ देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

2008 साली लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली. पण त्याआधी कोकणात राजापूर, रत्नागिरी आणि कुलाबा असे तीन महत्त्वाचे मतदारसंघ होते. पण 2008 सालानंतर हे तीनही मतदारसंघ बरखास्त झाले आणि त्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड हे दोन लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आले. 

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणूक, कोकण आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा इतिहास... 

लोकसभेत शिवसेनेचा धनुष्यबाण हा कोकणात नेमका कसा पोहचला.. कोकणातील कोणकोणत्या मतदारसंघात शिवसेनेने धनुष्यबाणावर आपले खासदार निवडून आले होते हेच आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. 

ADVERTISEMENT

1. राजापूर लोकसभा मतदारसंघ: 1957 सालापासून राजापूर हा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात होता. ज्यामध्ये रत्नागिरी, राजापूर आणि तळ कोकणाचा समावेश होता. सुरुवातीला म्हणजे 1957 पासून ते 1991 पर्यंत नाथ पै आणि मधु दंडवते यांचं या मतदारसंघावर प्राबल्य होतं. 

मात्र, 1991 साली पहिल्यांदाच बाळासाहेबांनी   आपला उमेदवार राजापूर मतदारसंघातून उतरविण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक यांनाच बाळासाहेबांनी राजापूरमधून तिकीट दिलं होतं. 

1991 मधील निवडणूक ही खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरली होती. कारण शिवसेनेच्या उमेदवारीमुळे तब्बल 5 टर्म खासदार म्हणून निवडून आलेल्या मधु दंडवते यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. इथून काँग्रेसचे सुधीर सावंत हे निवडून आले होते. तर शिवसेनेचे वामनराव महाडिक हे दुसऱ्या क्रमांकावर होते. तर विद्यमान खासदार मधु दंडवते हे थेट तिसऱ्या स्थानी फेकले गेलेले..

हे ही वाचा>> शिंदेंनी रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा गमावली; भाजपने जाहीर केला उमेदवार

1991 च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने राजापूर मतदारसंघात आपली ताकद दिवसेंदिवस वाढवत नेली. त्यानंतर 1996 साली पहिल्यांदाच शिवसेनेचे उमेदवार सुरेश प्रभू हे इथून निवडून आले. त्यानंतर सलग तीन वेळा म्हणजे 1998, 1999 आणि 2004 साली सुरेश प्रभू हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले. तेव्हापासूनच शिवसेना आणि कोकण यांचं नातं अधिक दृढ झाल्याचं दिसून आलेलं. 

दरम्यान, 2008 साली लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि राजापूर हा मतदारसंघ बरखास्त करून त्याऐवजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. 

नव्यानेच अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघात 2009 साली निलेश राणे हे काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यांनी सुरेश प्रभू यांचा त्यावेळी पराभव केला होता. 

मात्र, 2014 आणि 2019 साली शिवसेनेने पुन्हा इथे मुसंडी मारली. धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या विनायक राऊत यांनी सलग दोनदा नितेश राणे यांचा पराभव केला. 

पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात धनुष्यबाण हे चिन्हच मतदारांसाठी नसेल. 2022 साली शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे गेलं. तर शिवसेना (UBT) आणि मशाल हे चिन्ह ठाकरे गटाकडे आलं. 

येथील विद्यमान खासदार विनायक राऊत हे ठाकरे गटात असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनाच उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे यंदा ते मशाल या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. तर दुसरीकडे महायुतीत हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला असून तिथे भाजपने नारायण राणेंना उमेदवारी देऊ केली आहे. 

त्यामुळे यंदा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात यंदा मशाल विरुद्ध कमळ अशी थेट लढत आहे. पण आतापर्यंत वर्षानुवर्षे ज्या कोकणवासियांना धनुष्यबाण या चिन्हाची सवय झालेली ते त्यांना EVM वर दिसणारच नाही. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नेमका काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

2. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ: राजापूर मतदारसंघाप्रमाणेच 1952 सालापासून रत्नागिरी हा मतदारसंघ अस्तित्वात होता. जिथे 1996 सालापर्यंत प्रामुख्याने काँग्रेसचं वर्चस्व होतं. मात्र, 1996 साली शिवसेनेने धनुष्यबाण या चिन्हावर अनंत गीते यांना रत्नागिरी लोकसभेतून उतरविण्यात आलेलं. तेव्हापासून सलग 6 टर्म अनंत गीते हे खासदार म्हणून निवडून आले होते. 

1996 ते 2004 पर्यंत अनंत गीते हे रत्नागिरी या मतदारसंघातून धनुष्यबाण या चिन्हावर निवडून येते होते. मात्र 2008 साली मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली त्यामध्ये रत्नागिरी हा मतदारसंघ बरखास्त झाला. 

याच मतदारसंघातील काही भाग रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात गेला तर काही भाग हा रायगड मतदारसंघात गेला. त्यानंतर अनंत गीते हे रायगड या मतदारसंघातून निवडणूक लढवू लागले.

हे ही वाचा>> "देवेंद्रजींना कोणत्याही क्षणी अटक होणार होती", पाटलांचा गौप्यस्फोट

2009 साली अनंत गीते हे रायगडमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मतदारसंघ बदलल्याने अनंत गीतेंसाठी ही निवडणूक फारशी सोप्पी नव्हती. पण तरीही धनुष्यबाण या चिन्हाच्या जोरावर त्यांनी ही निवडणूक जिंकली होती. त्याप्रमाणेच 2014 मध्ये देखील अनंत गीतेंनी विजय मिळवला होता. मात्र 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरेंनी अनंत गीतेंचा पराभव करत पहिल्यांदाच राष्ट्रवादीला मोठं यश मिळवून दिलं होतं. 

मात्र, आता म्हणजेच 2024 मध्ये रायगड या मतदारसंघात देखील धनुष्यबाण हे चिन्ह मतदारांसमोर नसेल. 

अनंत गीते हे हे शिवसेना (ठाकरे गट) यांच्यासोबत आहेत आणि त्यांनाच रायगडमधून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता ते मशाल हे नवं चिन्ह घेऊन मतदारांसमोर जाणार आहेत. दुसरीकडे महायुतीत हा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला आहे. कारण या मतदारसंघात सुनील तटकरे हे रायगडचे विद्यमान खासदार आहेत. 

यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रायगडमध्ये यंदा मशाल विरुद्ध घड्याळ अशी लढाई असणार आहे. पण इथे कुठेही धनुष्यबाण हे चिन्ह मतदारांना आता दिसणार नाही.

3. कुलाबा लोकसभा मतदारसंघ: कोकणातील आणखी एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे कुलाबा हा मतदारसंघ होता. 1952 ते 2004 पर्यंत मतदारसंघ अस्तित्वात होता. कुलाबा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील बराचसा भाग आणि मुंबईच्या नजीकचा काही भाग होता. खरं तर या मतदारसंघात शिवसेनेला कधीही यश मिळालं नव्हतं. 1991 सालापासून शिवसेनेने धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवण्यास सुरुवात केली. 

1991 शिवसेनेने सतीश प्रधान, 1996 आणि 1998  साली अनंत तरे, 1999 साली डीबी पाटील आणि 2004 साली श्याम सावंत यांना उमेदवारी दिली होती. पण यापैकी एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. या मतदारसंघात कायमच शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस यांचं प्राबल्य राहिलं. याच मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले हे लोकसभेत निवडून गेले होते. 

मात्र 2008 साली हा मतदारसंघ बरखास्त झाला आणि त्यातील बराचसा भाग हा रायगड लोकसभा मतदारसंघात गेला. तर काही भाग मावळ आणि काही भाग दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघांमध्ये गेला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT