उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, नर्तिका पूजा गायकवाडच्या अडचणी वाढल्या
UPSarpanch Govind Barge suicide case : उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, सरकारी वकिलांच्या युक्तीवादानंतर नर्तिका पूजा गायकवाडच्या अडचणी वाढल्या
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट

नर्तिका पूजा गायकवाडच्या अडचणी वाढल्या
बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांच्या आत्महत्येप्रकरणी तुळजाई कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिचा जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही.एस. मलकलपत्ते रेड्डी यांनी फेटाळला. त्यामुळे पूजाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. “जर आरोपी पूजा गायकवाड हिला जामीन मंजूर झाला, तर समाजात चुकीचा संदेश जाईल आणि अशा प्रकारच्या महिलांकडून इतर पुरुषांना मानसिक, आर्थिक आणि शारीरिक छळ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.” असा युक्तीवाद सरकारी वकील डॉ. प्रदीपसिंग राजपूत यांनी कोर्टात केला. त्यानंतर न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत जामीन फेटाळला.
आत्महत्येमागील कारण
पूजा गायकवाड हिने प्रेमाच्या जाळ्यात ओढून गोविंद बर्गे यांच्याकडून मोठी संपत्ती उकळली. मोबाईल, बुलेट गाडी, सोने, वैराग येथील प्लॉट आणि शेती यांसह मोठ्या प्रमाणावर पैसा मिळविल्यानंतर तीने स्वतःच्या नावावर बंगला आणि पाच एकर जमीन करण्याचा तगादा लावला होता. मागणी पूर्ण न झाल्यास बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने बर्गे मानसिक तणावाखाली गेले आणि सप्टेंबर महिन्यात त्यांनी आत्महत्या केली.
हेही वाचा : नंदूरबार: देवीच्या यात्रेवरून येणारी पिकअप उलटली तब्बल 6 भाविकांचा गेला जीव अन्...
मंत्री प्रताप सरनाईक यांची ठाम भूमिका
गोविंद बर्गे आत्महत्या घटनेची गांभीर्याने दखल घेत राज्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हा प्रशासनाला कारवाईच्या स्पष्ट सूचना दिल्या. सरनाईक यांनी सांगितले की, “कला केंद्रांच्या आडून सुरू असलेल्या अनैतिक कृत्यांना आळा बसला पाहिजे. प्रशासनाने निर्भयपणे काम करावे, मी पूर्णपणे पाठीशी आहे.” या निर्देशांनंतर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी तुळजाई कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला. या प्रस्तावाला पोलिस अधीक्षक रीतू खोखर यांनी मान्यता दिली.