Baramati Lok Sabha : शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात महायुती गुलाल उधळणार का?
Sharad Pawar Vs Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक देशात चर्चेचा विषय आहे. या मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार मैदानात असल्या, तरी खरी प्रतिष्ठा शरद पवार आणि अजित पवारांची पणाला लागली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बारामती लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार

शरद पवार विरुद्ध अजित पवार
Baramati Lok Sabha Election, Supriya Sule Vs Sunetra Pawar : महाराष्ट्राबरोबर देशाचे लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे लागलेलं आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच ही लढत असून, काही अपवाद वगळता 1985 पासून हा मतदारसंघ शरद पवारांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. इतकी वर्ष पवारांना निवडणूक देणाऱ्या या या मतदारसंघातील उमेदवारांसमोर पहिल्यांदाच कोणत्या पवारांना मत द्यायचं हा प्रश्न उभा ठाकला आहे.
पवारांचा गड असलेली बारामती जिंकण्यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न झाले आहेत, पण अद्याप हे साध्य होऊ शकलेलं नाही. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पूर्ण ताकद लावली, पण विजय मिळू शकला नाही. दोन्ही वेळा सुप्रिया सुळे मताधिक्य घेऊन लोकसभेत गेल्या.
जानकरांना उतरवलं होतं रिंगणात
2014 मध्ये भाजपने राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान उभं केलं होतं. त्यावेळी देशात मोदी लाट होती. त्यात जातीय समीकरणं जुळवून आणत भाजपच्या ताकदीवर जानकर यांनी कडवी लढत दिली होती. पण, ६७ हजार मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
बारामतीत काय आहे समीकरण?
सुप्रिया सुळे यांना 2019 ची निवडणूक सोपी राहिली. पण, यावेळी ती अवघड झालेली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फूट पडली आहे. पक्षही फुटला आहे. हीच संधी साधण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचे दिसत आहे.