टीव्ही इंडस्ट्रीतील एक गोड आणि रोमँटीक कपल अशी ओळख असणारं कपल म्हणजे जय भानुशाली आणि माही विज. मात्र सध्या या दोघांनाही सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात येत होतं. स्वतःच मूल झाल्यानंतर दत्तक घेतलेल्या मुलांची हे दोघंही जबाबदारी घेत नसल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. अखेर या सर्व प्रकरणावर अभिनेत्री माही विजने स्पष्टीकरण दिलं आहे.
2010 साली जय आणि माही हे दोघंही विवाहबंधनात अडकले होते. त्यानंतर 2017 साली त्यांनी दोन मुलांना दत्तक घेतलं होतं. तर 2019 मध्ये त्यांना मुलगी झाली. तर या मुलीच्या जन्मानंतर दत्तक घेतलेल्या मुलीवरील प्रेम कमी झाल्याचं बोललं गेलं.
यासंदर्भात माहीने सोशल मीडियावरून एक मोठी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये माही सोशल मीडियावर करण्यात येणाऱ्या आरोपांचं खंडन केलं आहे. “सध्या लोकं जे बोलतायत ते चूक आहे. आम्ही आई- वडील आहोत. तारा एका सुंदर आशिर्वादाच्या रूपाने आमच्या आयुष्यात आली आहे. मात्र तिच्या येण्याने खुशी आणि राजवीरसाठी असलेलं आमचं प्रेम बदललं नाहीये. जेव्हा खुशी आमच्या आयुष्यात आली तेव्हा आम्ही पालक बनलो आणि याची आम्हाला जाणीव आहे. खुशीवर सगळ्यात पहिला अधिकार तिच्या आई-वडिलांचा आहे.”
माही पुढे म्हणते, “आमच्यासाठी सगळी मुलं एकसारखी आहेत. जेव्हा सगळे म्हणाले की, आम्ही त्यांना सोडलंय मात्र ते खरं नाहीये. आम्हाला हे वाचून दुःख होतंय. आमच्यासाठी तिन्ही मुलं एकसारखी आहेत.” अशा शब्दात माहीने ट्रोलर्सना उत्तर दिलंय.