लवकरच हरीओम हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या मराठी सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. दरम्यान या पोस्टरवर असलेल्या दोन तरूणांबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. अखेर यावरून पडदा उठला आहे. हरीओम सिनेमाच्या पोस्टरवर हरीओम गाडगे आणि गौरव कदम हे कलाकार आहेत.
हरीओम आणि गौरव हे दोघंही या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या दोन्ही कलाकारांमुळे मराठी सृष्टीला दोन नवखे कलाकार मिळणार आहेत. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये हरीओम आणि गौरव यांच्या खांद्यावर जगदंब आणि जय दुर्गे असं लिहिलेलं दिसतंय. शिवाय हे दोघंही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभे आहेत.
या सिनेमाचे आतापर्यंत दोन पोस्टर रिलीज करण्यात आले असून प्रेक्षकांनी या सिनेमासंदर्भात अनेक तर्कवितर्क लावलेत. पोस्टरवरून जरी हा सिनेमा अक्शन वाटत असला तरीही तो कौटुंबिक सिनेमा देखील असणार आहे. दरम्यान हरीओम आणि गौरव या दोघांचाही हा पहिला सिनेमा असल्याने त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. यावेळी त्यांनी तलवारबाजी तसंच दाणपट्टा यांचं खास प्रशिक्षणंही घेतलं आहे.
श्रीहरी स्टुडिओची प्रस्तुती असणारा हा सिनेमा आहे. अजून या सिनेमाची तारीख सांगण्यात आलेली नाही.चित्रपटाचे निर्माते हरिओम घाडगे तर दिग्दर्शक आशिष नेवाळकर आहेत.