Prakash Ambedkar : आधी जरांगेंना पाठिंबा आता विरोध, आंबेडकरांच्या यात्रेचा अर्थ काय?
Prakash Ambedkar Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांना उमेदवारी देण्यात यावी, असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसमोर ठेवला होता. त्याच जरांगेंच्या मागण्यांविरोधात आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रेची घोषणा केलीये.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मनोज जरांगेंच्या मागण्यांना आंबेडकर विरोध का करताहेत?

प्रकाश आंबेडकरांना विधानसभेला काय साध्य करायचे?

प्रकाश आंबेडकर यांच्या आरक्षण वाचवा यात्रेचा राजकीय अर्थ काय?
Prakash Ambedkar Vidhan Sabha Election 2024 : मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून उमेदवारी देण्यात यावी. जरांगे यांना मविआचे सामुहिक उमेदवार म्हणून उभं करावं असा प्रस्ताव वंचितकडून देण्यात आला होता. हा प्रस्ताव तर मान्य झालाच नाही तर दुसरीकडे मविआ आणि वंचितची युती देखील होऊ शकली नाही. प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठींबा देखील दिला होता. लोकसभेच्या निकालानंतर प्रकाश आंबेडकरांची भूमिका बदललेली दिसत आहे. २५ तारखेपासून आरक्षण बचाव यात्रा वंचित बहुजन आघाडीकडून काढण्यात येणार आहे. दुसरीकडे आंबेडकरांनी सगेसोयऱ्यांच्या जरांगेंच्या मागणीवर देखील आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर प्रकाश आंबेडकरांनी त्यांची भूमिका का बदलली. ही यात्रा काढण्यामागे त्यांचा नेमका हेतू काय आहे? (What is the political significance of Prakash Ambedkar's Reservation Yatra?)
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावेळी निर्माण झालेली परिस्थिती सध्या निर्माण झाली असून शांतता प्रस्थापित करणे हा वंचित बहुजन आघाडीच्या यात्रेचा हेतू असल्याचं प्रकाश आंबेडकरांकडून सांगण्यात आलं. २५ तारखेला या यात्रेला सुरुवात होणार आहे. ७ ऑगस्टला या यात्रेचा समारोप छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. जरांगेंच्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीबाबत आणि सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाबाबत सर्वपक्षांनी भूमिका मांडावी अशी मागणी केल्याचं देखील आंबेडकर सांगतात.
आरक्षणाचा तिढा : प्रकाश आंबेडकर कुणाच्या बाजूने?
प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंच्या आंदोलनाला भेट दिलेली असताना ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या हाकेंच्या आंदोलनाला देखील प्रकाश आंबेडकरानी भेट दिली होती. त्यामुळे जरांगे आणि हाके यांच्यात वाद असताना आंबेडकर नेमक्या कोणाच्या बाजूने आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
हेही वाचा >> "सत्तेतल्या बोक्यांनो मस्ती आली काय?", काँग्रेसचे साँग, महायुतीवर वार
लोकसभेच्या निवडणुकांचा विचार केला तर लोकसभेच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला यश मिळू शकलं नाही. काही जागा सोडल्या तर त्यांच्या उमेदवारांना फारशी मतं घेता आली नाहीत. अनेक ठिकाणी वंचितच्या उमेदवारांचे डिपॉझिट देखील जप्त झालं. स्वतः प्रकाश आंबेडकरांनादेखील अकोल्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत वंचितची लाट ओसरल्याचं चित्र दिसून आलं.