मुंबईतील सहा स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकिटांसाठी मोजावे लागणार ५० रुपये; कारण...

जाणून घ्या कुठल्या स्टेशनवर किती दर झाले आहेत?
मुंबईतील सहा स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकिटांसाठी  मोजावे लागणार ५० रुपये; कारण...
फोटो सौजन्य - India Today

मुंबईतल्या काही रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत १० रूपयांवरून थेट ५० रूपयांवर नेण्यात आली आहे. ही दरवाढ तात्पुरती आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि उन्हाळी हंगामात चेन पुलिंगच्या गैरवापरला आळा बसावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

Photo - Aaj Tak

काय म्हटलं आहे शिवाजी सुतार यांनी?

रेल्वे स्थानकांमध्ये होणाऱ्या वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि उन्हाळी हंगामात अलार्म चेन पुलिंगच्या गैरवापराला आळा घालण्यात यावा म्हणून प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत १० रूपयांवरून ५० रूपये करण्यात आली आहे. ९ मे ते २३ मे या कालावधीत ही दरवाढ असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, LTT, ठाणे, कल्याण आणि पनवेल या स्थानकांवर ही वाढ करण्यात आली आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

कोरोना काळात म्हणजेच लॉकडाऊन असताना प्लॅटफॉर्मवरची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांचे दरवाढ करण्यात आली होती. मात्र कोरोना नियंत्रणात आल्यानंतर आणि प्रवासाची मुभा सगळ्यांना दिल्यानंतर प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर कमी करण्यात आले. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने आणि गैरप्रकार वाढू लागल्याने तसंच गर्दीही वाढल्याने काही स्थानकांमध्ये प्लॅटफॉर्म तिकिट थेट ५० रूपये करण्यात आलं आहे. ही दरवाढ तात्पुरती आहे असंही मध्य रेल्वेने स्पष्ट केलं आहे.

AajTak

मध्य रेल्वेने हा निर्णय घेतल्यानंतर गर्दी नियंत्रणात येणार का? चेन पुलिंगच्या घटनांना आळा बसणार का? हे सगळं पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. अनेकदा लोक तिकीट न घेताही प्लॅटफॉर्मवर लोक शिरतात. त्या सगळ्या गर्दीला आळा कसा घालणार? याकडेही सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

मध्य रेल्वे प्रशासनाने काय म्हटलं आहे?

प्लॅटफॉर्म तिकिटांमध्ये करण्यात आलेली वाढ तात्पुरती आहे असं मध्य रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे १५ दिवसांनी हे तिकिट दर कमी केले जाऊ शकतात. मात्र हे गैरप्रकार थांबले नाहीत तर प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर आहेत तसेच राहण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.