सुनील राऊतांवर गंभीर आरोप! ठाकरे गटातील सुवर्णा कारंजे शिंदेंच्या सेनेत
विक्रोळी कांजूरमार्ग प्रभाग क्रमांक 117 च्या माजी नगरसेविका सुवर्णा कारंजे यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी आमदार सुनील राऊत यांच्यावर आरोप केला.
ADVERTISEMENT

Suvarna Karanje : विक्रोळी कांजूरमार्ग प्रभाग क्रमांक 117 च्या माजी नगरसेविका सुवर्णा कारंजे यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र केला. खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत सुवर्णा कारंजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, कारंजे यांनी केलेल्या आरोपांना सुनील राऊत यांनीही प्रत्युत्तर दिलं. (Ex corporator Suvarna Karanje allegations on Sunil Raut)
सुवर्णा कारंजे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडला. त्यानंतर ठाण्यात शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी सुनील राऊत यांच्यामुळे ठाकरेंचा पक्ष सोडत असल्याचा आरोप केला.
सुवर्णा कारंजेंनी सुनील राऊतांवर कोणते आरोप केले?
माध्यमांशी बोलताना सुवर्णा कारंजे म्हणाल्या, “ज्या ज्या वेळी यांनी (सुनील राऊत) मानसिक वा इतर त्रास दिला. त्या प्रत्येक वेळी मी संजय राऊत यांच्याकडे तक्रार केलेली आहे. त्यांनाही माहितीये की, त्यांचा भाऊ मला किती सतावतोय. पण, कदाचित असल्यामुळे तेवढ्यापुरतं ते बोलत होते, पण सुनील राऊतांचा स्वभाव असा आहे की, कुणाचं ऐकायचं नाही.”
“सुनील राऊत अधिकाऱ्यांना शिवीगाळ करतात…”
“त्यांची अरेरावी. त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यावर लक्षात येईल की किती अरेरावीने ते सगळ्यांशी बोलतात. अधिकाऱ्यांना तर शिवीगाळ करतात. त्यांचं तर म्हणणं होतं की, मला तिकीट देऊ नये. तिकीट दिल्यावर मी निवडून येऊ नये म्हणून त्यांनी भरपूर प्रयत्न केले. त्यांनी आव्हान दिलं होतं की, ही बाई निवडून येणार नाही आणि आली तर राजीनामा देईन. पण, मी निवडून आल्यावर त्यांनी राजीनामा काही दिला नाही”, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.