बुधवारी नागपुरात कोरोनाचा कहर पाहण्यास मिळाला. मागील चोवीस तासांमध्ये नागपूर शहरात १७१० नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली. नागपूरकरांसाठी ही अत्यंत चितेंची बाब मानली जाते आहे. नागपूर महानगरपालिका कोविड नियंत्रणासाठी विविध उपाय योजना करत आहे. मात्र लोक कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळत नसल्याचं नागपुरातलं चित्र आहे. नागपुरातल्या बाजारपेठांमध्ये गर्दी आहे. नागपुरातले नागरिक विनामास्क फिरत आहेत त्यामुळे कोविड रूग्णांचा चढता आलेख पाहण्यास मिळतो आहे. असंच चित्र कायम राहिलं तर नागपुरात कडक लॉकडाऊनची शक्यता आहे.
महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? जाणून घ्या परिस्थिती
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वाढ होणारी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या राज्य सरकारला चिंतेत पाडत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह विदर्भातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये निर्बंध आणि लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. २०२० मध्ये संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला. महाराष्ट्रातही आजच्या दिवशी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. वर्षभराच्या काळात देशभरासह राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला. अनेकांनी या विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढताना आपले प्राणही गमावले.
नवीन वर्षात कोरोनाची लस बाजारात आल्यानंतर लसीकरणाला सुरुवातही झाली. परिस्थिती नियंत्रणात येतेय असं वाटत असताना राज्यात गेल्या महिन्यांपासून रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होते आहे. राज्य सरकारने अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू केले आहेत.