भारत-चीन सैन्य पुन्हा आमने-सामने; अरुणाचल प्रदेशात 200 चिनी सैनिकांना रोखलं

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशाचं सैन्य आलं समोरासमोर; कमांडर स्तरीय बैठकीनंतर मुद्दा निकाली
भारत-चीन सैन्य पुन्हा आमने-सामने; अरुणाचल प्रदेशात 200 चिनी सैनिकांना रोखलं
अरुणाचल प्रदेशमध्ये भारत-चीन सैन्य पुन्हा आलं समोरासमोर.PTI

मागील कित्येक महिन्यांपासून भारत-चीन यांच्या सीमेवरून तणाव निर्माण झालेला असून, गेल्या आठवड्यात चिनी सैन्यानं भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याची माहिती पुढे आली आहे. अरुणाचल प्रदेशात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत 200 चिनी सैनिक आले होते, त्यांना भारतीय जवानांनी रोखलं. कमांडर स्तरीय चर्चेनंतर वाद मिटल्याचं संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी म्हटलं आहे.

अरुणाचल प्रदेशातील यांगत्से जवळ असलेल्या तवांग सेक्टरमध्ये मागील आठवड्यात भारतीय जवानांनी चीन जवळपास 200 सैनिकांना रोखलं. दैनंदिन सीमेवर गस्त घातल असताना चिनी सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय भूप्रदेशात घुसले होते.

चिनी सैनिकांना ताब्यात घेतल्याचंही वृत्त समोर आलं होतं. मात्र, संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे भारत-चीन सीमेचं अधिकृतपणे रेखाकंन करण्यात आलेलं नाही. दोन्ही देशांनी आपापल्या पद्धतीने सीमा निर्धारित केलेली आहे.

दोन्ही देश आपापल्या निश्चित केलेल्या धोरणानुसार गस्त घालतात. भारतीय हद्दीत आलेल्या चिनी सैनिकांना रोखल्यानंतर कमांडर स्तरीय चर्चा झाली. या बैठकीत ठरलेल्या प्रोटॉकॉल प्रमाणे चर्चा झाली आणि मुद्दा निकाली निघाल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.

चीनकडून झालेलं चिथावणीखोर कृत्य आणि एकतर्फी उपायामुळे क्षेत्रात शांतता भंग झाली असल्याचा मुद्दा भारताने पुन्हा एकदा उपस्थित केला असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितलं. तर चीनकडून घुसखोरी झाल्याच्या वृत्तावर मात्र त्यांनी उत्तर देणं टाळलं. सैन्यविषयक मुद्द्यावर भाष्य करू शकत नाही. संरक्षण मंत्रालय यावर उत्तर देऊ शकेल, असं ते म्हणाले.

दरम्यान, उत्तराखंडमध्ये चीनचे जवळपास 100 सैनिक सीमा ओलांडून भारतीय हद्दीत घुसल्याची माहिती समोर आली आहे. उत्तराखंडमधील बाराहाती येथील भारतीय हद्दीत 30 ऑगस्ट रोजी चिनी सैन्य जवळपास शंभर किलोमीटर आत भारतीय हद्दीत आलं आणि परत गेलं. भारतीय हद्दीत आलेल्या चिनी सैन्यानं परत जाण्यापूर्वी परिसरात उभारण्यात आलेल्या पुलाचं नुकसान केल्याचं म्हटलं होतं. मात्र अशी घटना झाल्याचं वृत्त संरक्षण यंत्रणांनी फेटाळून लावलं होतं.

Related Stories

No stories found.