वयाच्या सत्तरीतही आयुष्यासोबतचा संघर्ष सुरुच ! नागपूरच्या आजोबांची जिद्द तुम्हालाही प्रेरणा देईल

चना-पोहे, चिवडा विकून घर चालवण्यासाठी जयंतीभाईंचे कष्ट, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
वयाच्या सत्तरीतही आयुष्यासोबतचा संघर्ष सुरुच ! नागपूरच्या आजोबांची जिद्द तुम्हालाही प्रेरणा देईल

- योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी

आतापर्यंत आपण अनेकदा हालाकीच्या परिस्थितीसमोर हार मानत टोकाचं पाऊल उचलणारी माणसं पाहिली असतील. परंतू काही लोकं ही काहीही झालं तर संकटासमोर गुडघे टेकायचे नाहीत या हेतूनेच आयुष्यभर संघर्ष करत असतात. वयाच्या सत्तरीतही नागपूरला राहणारे जयंतीभाई हिंडोचा यांची कहाणीही काहीशी अशीच आहे.

गेल्या २० वर्षांपासून सायकलवर चना-पोहे, चिवडा विकणाऱ्या जयंतीभाईंचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर मुंबई तक ने त्यांच्याशी संपर्क साधत त्यांची कहाणी जाणून घेतली. ज्या वयात साधारणपणे व्यक्ती आपलं निवृत्तीचं जिवन कसं जाईल याचा विचार करत असतात तिकडे जयंतीभाई हे प्रत्येक दिवशी संकटांना आव्हान देत आपलं आयुष्य जगत आहेत.

वयाच्या सत्तरीतही आयुष्यासोबतचा संघर्ष सुरुच ! नागपूरच्या आजोबांची जिद्द तुम्हालाही प्रेरणा देईल
ऐकावं ते नवलच! नागपूरमधली काळी इडली ठरतेय चर्चेचा विषय, खवय्यांचीही मिळतेय पसंती

तरुणपणापासूनच जयंतीभाईंच्या नशिबात संघर्ष कायम लिहीलेलाच होता. सुरुवातीला नागपूरला त्यांनी काहीकाळ रिक्षा चालवली. त्यानंतर स्थानिक कपडा बाजारात ते एका दुकानात कामाला लागले. त्या काळात जयंतीभाईंना १५० रुपये पगार मिळत होता. कालांतराने लग्नानंतर मुलगी झाल्यानंतर खर्च वाढला म्हणून जयंतीभाईंनी आपल्या मालकाकडे पगार वाढवण्याची मागणी केली. परंतू मालकाने यासाठी टाळाटाळ केली त्यामुळे घराचा गाडा चालवायचा यासाठी जयंतीभाईंना चना-पोहे, चिवडा, चहा विकण्याची कल्पना सूचली.

जयंतीभाईंना एकूण तीन मुली, आपल्या तिन्ही मुलींचं त्यांनी सामुहिक विवाहसोहळ्यात लग्न लावून दिलं. मुलींची जबाबदारी संपली असली तरीही रोजच्या आयुष्यात जगताना खर्च निघणं गरजेचं होतं. आपल्या मुलीच्या सासरीही बेताची परिस्थिती असल्यामुळे तिच्याकडे वारंवार मदत मागणं जयंतीभाईंना कधीच जमलं नाही. त्यातूनच त्यांनी पुन्हा नोकरी करायचं ठरवलं. नागपूरच्या इतवारी भागातील एका गोडाऊनमध्ये जयंतीभाई वॉचमनची नोकरी करतात. ज्यासाठी त्यांना महिन्याकाठी ५ हजार रुपये मिळतात.

सध्या महागाईचा आक्राळविक्राळ राक्षस हा दिवसेंदिवस मोठा होत चालला आहे. बाजारात भाजीपाला घ्यायला गेलं किंवा डॉक्टरकडे गेलं तरीही १०० नोट सहज मोडली जाते. त्यात इतर खर्चही आलेत अशा परिस्थितीत बायको आणि आपला महिना ५ हजारात चालवणं केवळ अशक्य होतं. यावर उपाय म्हणून पोहे विकण्याची कल्पना जयंतीभाईंना सुचली. रात्री ८ ते सकाळी ८ जयंतीभाई गोडाऊनमध्ये वॉचमनचं काम करतात. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता कामावर निघताना जयंतीभाई सायकलवर पोहे-चना, चिवडा असं सर्व सामान बांधून विकतात.

कामावर जात असताना मस्कासाथ, गोळीबार चौक, गांधीबाग अशा भागातून फिरत पोहे विकतात. गेल्या काही वर्षांपासून जयंतीभाईंचा हा रोजचा प्रवास झाला आहे, त्यामुळे या प्रवासात त्यांनी अनेक ग्राहक जोडले आहेत. केवळ २० रुपये प्लेटमध्ये जयंतीभाई चना-पोहे आपल्या ग्राहकांना देतात, त्यामुळे काही ग्राहक तर खास जयंतीभाईंच्या येण्याची वाट पाहत असतात. प्रत्येकदिवशी या धंद्यातून जयंतीभाईंना कधी १०० तर कधी ३०० रुपये मिळतात. महिन्याअखेरीस घरातल्या हातखर्चासाठी ही रक्कम खूप कामाला येते असंही जयंतीभाईंनी मुंबई तकशी बोलताना सांगितलं.

जयंतीभाईंच्या पत्नी रंजना या देखील त्यांच्या प्रवासातल्या बरोबरीच्या साथीदार आहेत. गेली अनेक वर्ष रंजना जयंतीभाईंना नित्यनेमाने पोहे तयार करुन देण्याचं काम करत आहेत. अनेकदा सध्याची तरुणपिढी ही जराश्या अपयशामुळे किंवा संकटामुळे हार मानते. अशा तरुणांसाठी जयंतीभाईंचा हा प्रवास नक्कीच उमेद आणि प्रेरणा देणारा आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in