चार कारणं, ज्यामुळे अब्दुल सत्तार शिवसेनेची आमदारकी सोडायला तयार!

abdul sattar vs uddhav thackeray : अब्दुल सत्तारांच्या या भूमिकेमागची कारणं काय?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार अब्दुल सत्तार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार अब्दुल सत्तार

ठाकरेंनी चॅलेंज, तर ४० बंडखोरांना दिलं आहे. पण हे चॅलेंज केवळ एकानेच स्वीकारलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंचं आव्हान स्वीकारणारे आमदार आहेत अब्दुल सत्तार! अब्दुल सत्तारांनी आता ठाकरेंच्या आरेला कारे करण्याची भूमिका घेतली आहे. ठाकरेंचं चॅलेंज स्वीकारत ३१ तारखेला आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं आमदार सत्तार यांनी म्हटलं आहे. आव्हान स्वीकारतानाच सत्तारांनी एक अटही टाकली आहे. अब्दुल सत्तारांच्या चॅलेंज स्वीकारण्यामागे काय आहे राजकारण?

बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा दौरा (शिव संवाद यात्रा आणि निष्ठा यात्रा) सुरू आहे. या दौऱ्यात बंडखोरांना हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याचं आव्हान ठाकरेंकडून दिलं जातंय. शिवसेनेत बंड झाल्यावर बंडखोर पराभूत होतात, प्रभावहीन होतात, हा एक इतिहास राहिलाय. पण हाच इतिहास पुसण्याचं आव्हान स्वीकारलं आहे आमदार अब्दुल सत्तारांनी.

ठाकरेंच्या आरेला कारे करताना अब्दुल सत्तार म्हणाले, ‘मी तर आता मुख्यमंत्री औरंगाबादला येतील तेव्हा राजीनामा देणार आहे. माझा निर्णय निश्चित झाला आहे. केवळ मुख्यमंत्र्यांची परवानगी हवी आहे. त्यावेळेस बघू दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे, किस में कितना है दम देखते है, कोण गद्दार आहेत, हे लवकरच कळेल.’

अब्दुल सत्तारांच्या या भूमिकेमागची कारणं काय?

पहिलं कारण आहे. सिल्लोड मतदारसंघातलं राजकारण. कोणताही राजकीय वारसा नसलेले अब्दुल सत्तार गेल्या ३० वर्षांपासून राजकारणात आहेत. १९८४ मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीतून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. नगराध्यक्ष झाले. आणि गेल्या वीसेक वर्षांपासून सिल्लोड नगरपालिकेवर सत्तारांची एकहाती सत्ता आहे. चारवेळा आमदार झालेल्या सत्तारांचं मतदारसंघातल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीवरही वर्चस्व आहे.

विधानसभेत भाजपला हरवून ते आमदार झाले. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात अब्दुल सत्तारांएवढा प्रभाव असलेला दुसरा नेता नाही. सिल्लोडमध्ये हिंदू-मुस्लिम लोकसंख्या लक्षणीय आहे. आणि सत्तारांचा हिंदूंमध्येही मोठा प्रभाव आहे, हेच सत्तारांचं बलस्थान आहे. त्यामुळेच पुन्हा निवडणूक झाल्यास सत्तार पुन्हा विजयी होऊ शकतात, असं मतदारसंघातलं सध्याचं राजकीय गणित आहे. आणि याच्याच जिवावर सत्तार ठाकरेंना कारे करत आहेत.

दुसरं कारण आहे, काँग्रेसमधून आलेला शिवसैनिक सत्तारांनी आतापर्यंत चारवेळा विधानसभा लढवली. १९९९ मध्ये काँग्रेसनं तिकीट नाकारल्यानं अपक्ष लढले. सत्तार दुसऱ्या, तर काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. नंतर मात्र २००१ मध्ये काँग्रेसकडूनच विधान परिषदेवर गेले. २००४ मध्ये विधानसभेला भाजपकडून अवघ्या तीनशे एक मतांनी पराभूत झाले. २००९ पासून सलग तीनवेळा निवडून आले.

२०१९ ला तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. आणि भाजपची जागा शिवसेनेला सोडवूनही घेतली. विक्रमी मतांनी जिंकले. तसं सत्तारांना जायचं होतं, भाजपमध्ये. पण तिथे विरोध झाल्यानं ऐनवेळी शिवसेनेच्या गाडीत बसले.

बंडखोरांमध्ये अनेकांचं राजकारण हे शिवसैनिक म्हणून घडलं. तसं काही सत्तारांच्या बाबतीत नाही. शिवसेनेतलं त्यांचं वयच अवघं पावणेतीन वर्षाचं आहे. त्यामुळे इतर आमदारांमध्ये ठाकरेंबद्दल आदराचा जो धागा आहे, तो सत्तारांना लागू होत नाही. आणि हेच ठाकरेंच्या आरेला कारे करण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण आहे.

तिसरं कारण आहे, बस्तान बसवण्याची खेळी. ठाकरेंच्या मंत्रिमंडळात शिवसेनेतल्या जुन्या निष्ठावंतांना स्थान मिळालं नाही, पण नवख्या सत्तारांना मिळालं. आता शिंदे गटामध्ये मंत्रिमंडळ विस्तारासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. सत्तारही इच्छूक आहेत. त्यामुळेच ठाकरेंचं चॅलेंज स्वीकारणं ही स्वतःचंच बस्तान बसवण्यासाठी सत्तारांची खेळी असल्याचंही म्हटलं जातंय.

सत्तारांबद्दलची आणखी एक गोष्ट म्हणजे बंड झाल्यानंतर सगळ्याच बंडखोरांच्या मतदारसंघात तणाव निर्माण झाला. बंडखोरांविरुद्ध मोर्चे, निदर्शनं सुरू झाली. यानंतर बंडखोर गटाचं पहिलं शक्तिप्रदर्शन ठाण्यात झालं आणि दुसरं सिल्लोडमध्ये झालं होतं.

चर्चेत राहणं, हे एक महत्त्वाचं वैशिष्टयं आहे. कारण पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह, चर्चेत राहणं हे अब्दुल सत्तारांचं एक अंगभूत वैशिष्ट्यं. वेगवेगळ्या विधानांमुळे ते नेहमी चर्चेत राहतात. आणि चर्चेत राहण्यासाठी ते वेगवेगळी आव्हानं देतात, घेतात. रावसाहेब दानवेंना पराभूत केल्याशिवाय डोक्यावरची टोपी काढणार नाही, असं एक चॅलेंज सत्तारांनी दिलं होतं. पण आता सत्तार आणि दानवेंमध्ये नव्यानं दिलजमाई झालीय. मागं उद्धव ठाकरे आजारी असताना शिवसेनेतल्या कुण्या आमदाराची हिंमत झाली नसती ते विधान सत्तारांनी केलं. रश्मी ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हायला हवं, असं सत्तार म्हणाले होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in