शिंदे सरकारकडे दोन मागण्या! अजित पवारांचं मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री फडणवीसांनाही पत्र

विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टीग्रसह पावसाळी अधिवेशनाकडे अजित पवारांनी वेधलं लक्ष
ajit pawar letter to eknath shinde and devendra fadnavis
ajit pawar letter to eknath shinde and devendra fadnavis

राज्यातील सत्तांतरानंतर विरोधी पक्षनेते बनलेल्या अजित पवारांनी लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला आहे. अजित पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं असून, दोन मागण्या केल्या आहेत.

अजित पवार यांनी पत्रात काय म्हटलंय?

अजित पवारांनी पत्रात म्हटलं आहे की, "जून महिन्याच्या जवळपास २० तारखेपासून ते आजपर्यंत (२५ जुलै) सातत्यानं पाऊस पडत आहे. राज्यातील काही भागांमध्ये मी स्वत: पाहणी केली असून, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याशी सातत्यानं दूरध्वनीद्वारे संपर्कात आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पावसाने जमिनी वाहुन गेल्या असून, घरांचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. स्थावर मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे."

"सततच्या पावसामुळे पंचनामे अजुनपर्यंत होऊ शकले नाहीत. पूर्वीच या दोन्ही विभागामध्ये शेतकरी अडचणीत असताना मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होण्याचं प्रमाण निदर्शनास आले आहे. यावर तातडीने त्यांना एक दिलासा म्हणून त्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टींने व आत्महत्या होऊ नये याकरिता या दोन्ही विभागांमध्ये व राज्याच्या इतर विभागामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची नितांत आवश्यकता आहे," असं अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

पावसामुळे महाराष्ट्रात प्रचंड नुकसान झालं-अजित पवार

"पावसामुळे शेतपिके वाहुन गेली असून, शेतीसाठी वापरण्यात आलेली बियाणं, खतं यांचं नुकसान झालेलं आहे. आजपर्यंत १०० पेक्षा जास्त व्यक्तींचा अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे. या नुकसानीचे अद्यापपर्यंत पंचनामे होऊ शकले नाहीत. शहरी भागातील तसेच विशेषत: ग्रामीण भागातील रस्ते अतिवृष्टीमुळे वाहुन गेले आहेत," असं सांगत अजित पवारांनी नुकसानीकडे लक्ष वेधलं आहे.

"अतिवृष्टीमुळे विशेषकरुन ग्रामीण भागात वीज वितरण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी वीजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे महावितरण, महापारेषण व एकंदरीत ऊर्जा विभागामार्फंत तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. या परिस्थितीमुळे दुर्देवाने शेतकरी आत्महत्या करीत आहेत."

"आपणांस कल्पना आहे की, जोपर्यंत तेथील लोकप्रतिनिधी स्वत: पुढाकार घेऊन ही कामे यंत्रणेसोबत हातात हात घालून करत नाहीत तोपर्यंत नुकसानीचा अंदाज येत नाही. मंत्रिमंडळ स्थापन न झाल्यामुळे पालकमंत्री जी जबाबदारी संभाळत असतात तेथेसुध्दा आज पालकमंत्री नसल्याने या यंत्रणेला दिशा देण्याचे काम होऊ शकत नाही," असा मुद्दा अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केला आहे.

"१ ऑगस्टला पावसाळी अधिवेशन बोलवा"

"पूर्वीच्या शासनाने १८ जुलैला पावसाळी अधिवेशन घेण्याचे निश्चित केलं होतं. पंरतू राज्यातील राजकीय घडामोडीमुळे अनिश्चित काळासाठी अधिवेशन पुढे गेलं आहे. विविध माध्यमांमध्ये वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या जात असून, अधिवेशन कधी होईल याची निश्चित: नाही."

"माझी आपणास विधीमंडळातील सर्व पक्षांच्या विधानसभा सदस्यांच्या वतीने विनंती आहे की, १ ऑगस्ट २०२२ रोजी किंवा आपण या आठवड्यातील शासनास सोयीच्या तारखेला अधिवेशन बोलवावे व अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना विधानसभेच्या लोकप्रतिनिधींच्या चर्चेतून व नुकसानीसंदर्भांत शासनाच्या धोरणाची योग्य ती दिशा समजून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करता येईल," अशी मागणी अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in