अल कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार, बायडेन काय म्हणाले?

अफगाणिस्तानातील काबुलमध्ये अमेरिकेचा ड्रोन हल्ला, राष्ट्रपती जो बायडेन यांच्याकडून दुजोरा
Al Qaeda leader Ayman al-Zawahiri was killed in a CIA drone strike in Afghanistan
Al Qaeda leader Ayman al-Zawahiri was killed in a CIA drone strike in Afghanistan

अल कायदाचा प्रमुख लिडर अयमान अल जवाहिरी अमेरिकेनं केलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला. अमेरिकेनं अफगाणिस्तानातील काबूलमध्ये हाती घेतलेल्या दहशतवादी विरोधी कारवाईत जवाहिरीचा खात्मा करण्यात आला. CIA ने त्यांचा खात्मा केल्याची माहिती आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन जवाहिरीचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर ७१ वर्षीय अयमान अल जवाहिरीकडे अल कायदाची सुत्रं आली होती. अल जवाहिरी काबुलमधील एका घऱात लपून बसलेला होता. त्याचवेळी ही अमेरिकेच्या सीआयएने ही कारवाई केली.

सीएनएनच्या वृत्तानुसार अयमान अल जवाहिरी हा काबुलमध्ये आश्रयाला होता. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अमेरिकेनं केलेल्या ड्रोन हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री ९ वाजून ४८ मिनिटांनी ड्रोनने जवाहिरीचा वेध घेण्यात आला. अमेरिकेकडून Hellfire मिसाईलचा वापर करण्यात आला.

अयमान अल जवाहिरीवरील हल्ल्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या त्यांच्या कॅबिनेटसह सल्लागारांशी काही आठवड्यांपासून बैठका सुरू होत्या, अशी माहितीही आता समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिकेनं केलेल्या जवाहिरीवर केलेल्या हल्ल्यावेळी एकही अमेरिकन नागरिक काबूलमध्ये नव्हता.

अयमान अल जवाहिरी काबुलमध्ये असल्याची माहिती हक्कानी तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांना होती. हे दोहा कराराचं उघड उघड उल्लंघन असल्याचं अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. तालिबानने जवाहिरी काबुलमध्ये असल्याची माहिती लपवण्याचा प्रयत्न केला. जवाहिरीच्या ठिकाण्यापर्यंत कुणालाही पोहोचता येणार नाही, याबद्दल तालिबानकडून खबरदार घेण्यात आली होती. त्यामुळेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांचं ठिकाण बदलण्यात आलं होतं, असं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

ड्रोन हल्ल्यात अयमान अल जवाहिरीच्या कुटुंबाला लक्ष्य करण्यात आलं नाही. या हल्ल्यात जवाहिरीच्या कुटुंबियांचं कोणतंही नुकसान झालं नाही, असं अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेच्या या मोहिमेची माहिती तालिबानलाही देण्यात आलेली नव्हती.

अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झालेला अयमान अल जवाहिरी कोण होता?

अयमान अल जवाहिरी गेल्या ११ वर्षांपासून अल कायदाची सुत्रं सांभाळत होता. जवाहिरी हा कधीकाळी ओसामा बिन लादेनचा पर्सनल फिजिशियन होता. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार जवाहिरी इजिप्तमधील एका प्रतिष्ठीत कुटुंबाचा सदस्य होता.

अयमान अल जवाहिरीचे आजोबा रबिया अल जवाहिरी काहिरामध्ये अल अजहर विद्यापीठात इमाम होते. पणजोबा अब्देल रहमान आझम अरब लीगचे पहिले सचिव होते. इतकंच नाही, तर अमेरिकेवर हल्ला करणाऱ्या सुत्रधाराला जवाहिरीने मदत केली होती.

११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यापासूनच अयमान अल जवाहिरी सातत्याने लपून होता. अफगाणिस्तानातील पहाडी बोरा क्षेत्रात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यातून जवाहिरी वाचला होता. तर त्यांच्या पत्नीसह मुलांचा मृत्यू झाला होता.

कुठेही लपून बसा आम्ही शोधू; जवाहिरीचा खात्मा केल्यानंतर जो बायडेन काय म्हणाले?

अल कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरी ड्रोन हल्ल्यात ठार झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्विट्स केले आहेत. "शनिवारी माझ्या निर्देशानुसार अमेरिकेने अफगाणिस्तानातील काबूलमध्ये यशस्वीपणे हवाई हल्ला केला. यात अल कायदाचा अयमान अल जवाहिरी ठार झाला. न्याय मिळाला आहे", असं बायडेन यांनी म्हटलंय.

दुसऱ्या ट्विटमध्ये जो बायडेन म्हणतात, "अमेरिकन नागरिकांना हानी पोहोचवू पाहणाऱ्यांविरोधात आणि आमच्या नागरिकांची सुरक्षा करण्याबद्दलचा अमेरिकेचा संकल्प व क्षमता आम्ही दाखवत राहू. आज रात्री ते आम्ही सिद्ध केलं आहे. कितीही वेळ लागो, तुम्ही कुठेही लपून बसा आणि तुम्हाला शोधू", असं बायडेन यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in