– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी
नागपूर आणि नजिकच्या परिसरात आपलं सावज हेरुन त्यांच्याशी लग्न करुन नंतर काही कारणाने नवऱ्याच्या घरच्यांना लुटणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. भाविका उर्फ मेघाली मनवानी उर्फ मेघाली तिजारे, वासनिक, लाकडे, गवई अशा अनेक जणांना या महिलेने आपल्या जाळ्यात ओढून गंडा घातला आहे. जरीपटका पोलीस ठाण्याने या प्रकरणात आरोपी महिला मेघाली आणि तिचा खरा बॉयफ्रेंड मयूर मोटघरेला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेघालीने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढून लग्न केल्यानंतर आपल्या पती आणि सासरच्या व्यक्तींवर घरगुती हिंसाचार, हुंड्यासाठी प्रतारणा, चौरी, अनैसर्गिक कृत्य असे आरोप करत त्यांच्याकडून पैसे उकळत होती. नागपूरमध्येच जरीपटका, बुटीबोरी, नंदनवन तर वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आणि पुलगाव पोलीस ठाण्यात या आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल असल्याचं कळतंय.
काही दिवसांपूर्वी मेघालीने नागपूरच्या कळमना मार्केट भागातील भाजी विक्रेता महेंद्र मनवानीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. यानंतर मेघालीने महेंद्रला आपल्यासोबत दुष्कर्म केल्याची धमकी देत त्याच्यासोबत लग्न केलं. महेंद्रने दबावाखाली येऊन मेघालीसोबत लग्न केल्यानंतर तिने काही काळातच हुंड्यासाठी मारहाण, अनैसर्गिक कृत्य, मारपीट करणं यासारख्या गुन्ह्यांमध्ये महेंद्र आणि तिच्या परिवाराविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात महेंद्रला तुरुंगवास झाल्यानंतर मेघालीने त्याची जेलमध्ये जाऊन भेट घेत त्याच्याकडे 4 लाखांची मागणी केली.
यानंतर महेंद्रने आपल्या वडीलांना सांगून मेघालीला 2 लाख 10 हजार रुपये द्यायला सांगितले. जेलमधून बाहेर आल्यानंतर महेंद्रने जरीपटका पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना आपल्यावर आलेली आपबीती सांगितली. त्यानंतर जरीपटका पोलीस ठाण्याने चौकशी करत मेघाली आणि तिचा बॉयफ्रेंड मयूरला अटक केली आहे. तपासाअंती मेघाली आणि मयूरनेही लग्न केल्याचं निष्पन्न झालं आहे.