अखेरचा प्रवासही बैलगाडीच्या सोबतीनेच ! बैलगाडा मालकाची शेवटची इच्छा गावकऱ्यांनी केली पूर्ण

साकोरे गावातील बबन लोहोटे यांच्या अंत्ययात्रेत गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
अखेरचा प्रवासही बैलगाडीच्या सोबतीनेच ! बैलगाडा मालकाची शेवटची इच्छा गावकऱ्यांनी केली पूर्ण
लोहोटे आपल्या बैलांसोबत एका निवांत क्षणी

- स्मिता शिंदे, प्रतिनिधी आंबेगाव

काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवली. राज्यात बैलगाडा शर्यतींचा मोठा इतिहास आहे. ग्रामीण भागात या शर्यतींवर मोठं अर्थकारण चालतं. बैलगाडा आणि त्या बैलगाड्याचा मालक यांच्यातलं नात मोठं दृढ मानलं जातं. याचाच प्रत्यय पुणे ग्रामीण भागातील आंबेगाव तालुक्यात साकोरे गावात आला. जिथे कॅन्सरच्या आजाराने निधन पावलेल्या बैलगाडा मालकाची अंत्ययात्रा त्याच्या इच्छेनुसार बैलगाडीतून नेण्यात आली.

साकोरे गावातील शेतकरी बबन लोहोटे (वय ७२) यांचं नुकतच कॅन्सरच्या आजाराने निधन झालं. लोहोटे यांची २० गुंठे जमीन होती. बैलांना ओला-सुका चारा मिळावा आणि आपला उदरनिर्वाह होईल इतकीच पारंपरिक पिकं ते आपल्या शेतात घ्यायचे. लोहोटे यांची दोन्ही मुलं भारतीय सैन्यात आहेत. त्यामुळे आयुष्याच्या उतारवयात लोहोटे हे आपल्या पत्नीसोबत गावी बैलगाडा घेऊन आयुष्य जगत होते. लोहोटे यांना बैलगाडा शर्यतीत भाग घेण्याचा मोठा उत्साह होता. भावकी आणि आपल्या मित्रमंडळींना सोबत घेऊन ते घाटात बैलांची बारी पळवायचे. परंतू गेल्या सहा महिन्यात कॅन्सरच्या आजाराने डोकं वर काढल्यामुळे त्यांचं घराबाहेर पडणं थोडं कमी झालं.

या अंत्ययात्रेत सर्व गावकरी सहभागी झाले होते
या अंत्ययात्रेत सर्व गावकरी सहभागी झाले होते

काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठवल्यानंतर लोहोटे यांना चांगलाच आनंद झाला होता. परंतू कॅन्सरने शरिरात घर केल्यामुळे आता आपण फारकाळ जगणार नाही हे त्यांनी ओळखलं होतं. यावेळी त्यांनी गावातील आपल्या मित्रांकडे आपल्या मरणावनंतर माझी अंत्ययात्रा बैलगाडीतून काढण्याची इच्छा व्यक्त केली होती. घाटात आपल्या बारीचं नाव पुकारलं जावं अशी लोहोटे यांची इच्छा होती. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवून एक अनोखा योगायोगही जुळवून आणला होता. परंतू कॅन्सरच्या आजाराने लोहोटे यांची शर्यतीत सहभागी होण्याची शेवटची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.

लोहोटे आपल्या बैलांसोबत एका निवांत क्षणी
बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवली : बेल्हेच्या बाजारात बैलांच्या किंमतीत वाढ

बबन लोहोटे यांच्या पश्चात तीन मुलं, एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. बबन यांच्या जाण्यामुळे शोकाकूल झालेल्या गावकऱ्यांनी त्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढत त्यांना अखेरचा निरोप दिला. आंबेगाव तालुक्यात या अनोख्या अंत्ययात्रेची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in