वर्षाअखेरीस गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला भाजप लागला आहे. अहमदाबाद दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी काँग्रेसवर टीका करताना, काँग्रेस हा आता फक्त भाऊ-बहिणीचा पक्ष राहिल्याचं नड्डा म्हणाले आहेत.
अहमदाबाद येथील GDMC convention center मध्ये नड्डांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. “देशातले सर्व प्रादेशिक पक्ष आता पारिवारिक पक्ष झाले आहेत. सध्या देशात कोणताही राष्ट्रीय पक्ष राहिलेला नाही. भाजप हा एकमेव पक्ष सध्या राहिला आहे. काँग्रेस सध्या फक्त दोन राज्यांमध्ये अस्तित्वात आहे. ही परिस्थितीही बदलणार आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष ना भारतीय ना राष्ट्रीय पक्ष असून तो फक्त आता भावा-बहिणीचा पक्ष राहिला आहे.”
यानंतर नड्डा यांनी बोलत असताना देशातील प्रादेशिक पक्षांच्या परिस्थितीबद्दल भाष्य केलं. जम्मू काश्मीरमधील नॅशन कॉन्फरन्स, पिपल्स डेमोक्रॅटीक पार्टी, पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल, उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी, झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस हे सर्व पक्ष आता पारिवारिक पक्ष झाल्याचं नड्डा म्हणाले. आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडूतही अशीच परिस्थिती असल्याचं नड्डा म्हणाले. महाराष्ट्रातही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पारिवारिक पक्ष झाल्याचं नड्डांनी सांगितलं.
एक दिवसीय गुजरात दौऱ्यावर असलेल्या नड्डा यांनी आज भाजप आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गांधीनगर, वडोदरा आणि अहमदाबाद अशा तीन शहरांमध्ये नड्डा यांनी भेट देऊन भाजप पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला.