माझ्या तीन बहिणींच्या कारखान्यांवर छापे का मारले? अजित पवार संतापले
deputy cm ajit pawar angry income tax department raid 3 sister ncp bjp

माझ्या तीन बहिणींच्या कारखान्यांवर छापे का मारले? अजित पवार संतापले

Ajit Pawar income tax department raid: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरावर, कारखान्यांवर आयटी विभागाकडून करण्यात आलेल्या छापेमारीबाबत अजित पवारांनी संताप व्यक्त केला आहे.

पुणे: आयकर विभागाने राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या कंपन्यासह त्यांच्या तीन बहिणींच्या कंपन्यांवर देखील आज (7 ऑक्टोबर) अचानक छापे मारले. यावेळी आयकर विभागाने मारलेल्या या छाप्यांबाबत अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एवढंच नव्हे तर हे सगळे छापे फक्त राजकीय हेतूने मारण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी त्यांच्या तीन बहिणींच्या घरी आणि कारखान्यांवर मारलेल्या छापेमारीविषयी दु:ख व्यक्त केलं आहे. फक्त त्या माझ्या बहिणी आहेत या हेतून झालेली ही कारवाई आहे असंही अजित पवार म्हणाले.

'मला एका गोष्टीचं खूप दु:ख झालं..'

'आयकर विभागाने माझ्याशी संबंधित कंपन्यांवर छापा मारला याबद्दलही मला काही म्हणायचं नाही. पण मला एका गोष्टीचं खूप दु:ख झालं. ते म्हणजे माझ्या तीन बहिणींच्या घरावर कारखान्यांवर देखील छापे मारण्यात आले.'

'या तीनही बहिणींची 35 ते 40 वर्षापूर्वी लग्न झालेली आहेत. त्यातील एक बहीण कोल्हापूर आणि दोन पुण्यातील आहेत. त्यांच्या कारखान्यांवर देखील धाडी टाकल्या. आता यामागचं मला कारण माहिती नाही. त्या आपलं जीवन व्यवस्थित आपलं जगत आहेत. त्यांच्या मुलांची-मुलींची लग्न झालेली आहेत, नातवंडं आहेत. पण फक्त अजित पवारांचे नातेवाईक म्हणून जर आयकर विभागाने धाड टाकली असेल तर राज्यातील जनतेने याचा विचार करावा. कोणत्या पातळीवर जाऊन या संस्थांचा वापर केला जातो, हे देखील जनतेनं पाहावं.'

'माझ्या कंपन्यांवर धाड टाकली याचं मला काही नाही, पण नातेवाईकांच्या घरी आणि कारखान्यांवर धाड कशी? त्यांचा राजकारणाशी संबंध नाही, कारखान्यांशी संबंध नाही.. फक्त त्या माझ्या बहिणी आहेत म्हणून धाडी टाकायचा याचं मला वाईट वाटलं. इतक्या खालच्या थराला जाऊन राजकारण करणं मला पटलेलं नाही.'

'सरकार येत असतं जात असतं, पण जनता सर्वस्व आहे. जनता योग्य तो निर्णय घेत असते. मागे निवडणुकीच्या काळात, पवारसाहेबांचा एका बँकेशी काहीचा संबंध नसताना नोटीस आली, त्यावेळी राजकारण सर्वांनी पाहिलं.' असं म्हणत अजित पवारांनी या छापेमारीबाबत संताप व्यक्त केला आहे.

अजित पवारांच्या तीनही बहिणींच्या घरावर छापे

अजित पवारांच्या ज्या तीन बहिणींच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे त्यापैकी सर्वात मोठ्या बहीण डॉक्टर रजनी इंदूलकर या पुण्यातील बावधन भागात राहतात. आज सकाळपासून इथे आयकर विभागाचे अधिकारी सुरक्षा रक्षकांसह पोहचले आहेत.

अजित पवारांच्या बहिण नीता पाटील या पुण्यातील मोदी बाग सोसायटीत राहतात. त्या गृहिणी असून त्यांचे पती डॉक्टर आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे पुण्यात मोदी बाग सोसायटीतच राहतात. त्यांच्या घराच्या शेजारीच हे छापे सुरु आहेत.

तर विजया पाटील या कोल्हापुरात असतात. त्यांच्या घरी देखील आयकर विभागाने छापे मारण्यास सुरुवात केली आहे.

deputy cm ajit pawar angry income tax department raid 3 sister ncp bjp
अजित पवारांसह बहिणींच्या कारखान्यांवरही आयकर विभागाची छापेमारी, राज्यात अनेक ठिकाणी धाडसत्र

नेमकं प्रकरण काय?

आयकर विभागानं आज सकाळच्या सुमारास एकाच वेळी राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर छापे टाकले. काही वेळाने ही बाब स्पष्ट झाली की, हे सगळे साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे आहेत. तसंच अजित पवार यांच्या काही कंपन्यांवर देखील छापेमारी करण्यात आलेली आहे.

दुसरीकडे काही साखर कारखान्याचे संचालक यांना आयकर विभागाने चौकशीसाठी बोलावलं आहे तर काही जणांच्या घरी धाड टाकण्यात आली आहे. कर चुकविल्याचा संशय असल्याने ही छापेमारी केल्याचं सांगण्यातत येत आङेत.

यावेळी जरंडेश्वर साखर, दौंड शुगर्स, आंबालिका शुगर्स , कारखाना, पुष्पदनतेश्वर शुगर आणि नंदूरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाने धाडी मारल्या. दुसरीकडे बारामतीमधील एका कंपनीसह काटेवाडीमधील एका व्यक्तीच्या घरावर देखील छापा मारण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in