सातारा जिल्हा बँक निवडणूक: शशिकांत शिंदेंसाठी शरद पवार मैदानात; शिवेंद्रराजे, मकरंद पाटलांना केला फोन
शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...

सातारा जिल्हा बँक निवडणूक: शशिकांत शिंदेंसाठी शरद पवार मैदानात; शिवेंद्रराजे, मकरंद पाटलांना केला फोन

शशिकांत शिंदेंचे प्रतिस्पर्धी रांजणी यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यायला नकार, निवडणुकीत रंगत

सातारा जिल्हा बँकेचे निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरले आहेत. शशिकांत शिंदे निवडून यावेत यासाठी शरद पवारांनी थेट भाजपचे विद्यामान आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादी आमदार मकरंद आबा पाटील यांना फोन केल्याचं कळतंय.

कोणत्याही परिस्थितीत शशिकांत शिंदे निवडून आले पाहिजेत असे आदेश पवारांकडून आल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले आणि मकरंद पाटील यांनी शिंदेच्या विरुद्ध उभे असलेल्या जावळी सोसायटी मतदारसंघातील ज्ञानदेव रांजणी यांची मनधरणी करायला सुरुवात केली आहे. परंतू त्याला अद्याप यश आलेलं नसल्याचं कळतंय.

सातारा जिल्ह्यात इतर मतदार संघ असताना जावळीच्या जागेसाठी इतकं प्रेशर का आहे असा सवाल ज्ञानदेव रांजणी यांनी आपली बाजू मांडताना शिवेंद्रराजे यांना विचारल्याचं कळतंय. शरद पवारांकडून आलेला निरोप असल्याचं सांगितल्यानंतरही रांजणी यांनी माघार न घेण्याचं ठरवल्यामुळे २१ तारखेला होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे.

शशिकांत शिंदेंच्या विरोधात ज्ञानदेव रांजणी यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांनी आतून चक्र फिरवल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमुळे चक्रव्यूहात सापडलेल्या शशिकांत शिंदेंसाठी खुद्द शरद पवार, अजित पवार आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी रांजणी यांना फोन करुन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतू रांजणी यांनी आपला हट्ट न सोडता मला लढू द्या अशी भूमिका घेतल्यामुळे यंदाची जिल्हा बँकेची निवडणूक रंगतदार होणार असल्याचं दिसतंय.

मतदानाच्या आजच्या आदल्या दिवसापर्यंत अनेक घडामोडी या मतदारसंघात घडल्या आहेत. ज्ञानदेव रांजणे यांनी २८ मतदार टुरवर पाठवून आमदार शिंदेंपुढे अडचण निर्माण केली होती. मुळात जागा वाटपाच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकांच्या दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला जावळी सोसायटीतून निवडणूक लढण्यास सांगितल्याचे रांजणे यांनी सांगून गुगली टाकली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडे ३४ मते असल्याचे सांगितले होते.

हॉटेल फर्नमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत रांजणे यांनी अर्ज मागे घेण्यास नकार देत शिंदेंपुढे आव्हान निर्माण केले होते. त्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील व शशीकांत शिंदें यांच्यात बैठक होऊन रांजणे यांचा अर्ज मागे घेण्याबाबत ठरले होते. त्यानंतर आमदार शिंदें आजारी पडल्याने या प्रक्रियेपासून थोडे लांब राहिले. याचा फायदा उठवत रांजणे यांनी जावळीतील २८ मतदार सुरक्षितस्थळी रवाना केले. शशीकांत शिंदे परत साताऱ्यात येईपर्यंत बरेचसे पाणी पुलाखालून गेले होते. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी रांजणे मतदारांसह 'नॉट रिचेबल' झाले होते.

शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
सातारा जिल्हा बँक निवडणूक : चार राजे बिनविरोध, पण माजी पालकमंत्र्यांसमोर विजयाचं मोठं आव्हान

त्यानंतर आमदार शिंदे जावळीत ठाण मांडले व मतदारांशी व त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करून त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली. अगदी तामीळनाडू, कर्नाटक, बालाजीपर्यंत त्यांनी या मतदारांचा पाठलाग केला. पण, त्यांच्या हाती थोडे मतदार लागले. आमदार शिंदेंनी जावळीतील उर्वरित मतदार सुरक्षित स्थळी नेले आहेत. त्यामुळे आमदार शिंदे व रांजणे यांच्याकडील मतदारांचा फरक दोन, चार मतांचा आहे. याची जुळणी करण्याचे काम शशीकांत शिंदे करत आहेत. आणखी दोन, तीन मते फोडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

जावळीच्या रणांगणात आमदार शशीकांत शिंदे हे अडचणीत असल्याची माहिती काही निष्टावंतांनी खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत पोहोचवली. त्यानुसार काल खासदार शरद पवार यांनी आमदार मकरंद पाटील व शिवेंद्रसिंहराजे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क करून शशीकांत शिंदेंचा जिल्हा बँकेत येण्याचा मार्ग सोपा करावा, अशी सूचना केली. यावेळी त्यांनी आमदार मकरंद पाटलांनाही कानपिचक्या दिल्याचे सांगितले जात आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आमदार शिवेंद्रसिंहराजेंशी मोबाईलवरून संपर्क करून आमदार शिंदेंना मदत करण्याची सूचना केली आहे.

शरद पवार व अजित पवार यांच्या सूचनेनुसार आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी जावळीतील मतदारांशी संपर्क करून गणपतीपुळे गाठले. त्यांनी तेथे मतदारांची मनधरणी करत शशीकांत शिंदेंना मदत करण्याचे आवाहन केले आहे. आता रांजणे यांनी नेलेले सर्व मतदार जावळी तालुक्यात आलेले आहेत. उद्या (रविवारी) जिल्हा बँकेसाठी मतदान होत आहे. मतदानावेळी जावळीत मतदारांसह आपल्या जीविताला धोका असल्याची तक्रार श्री. रांजणे यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. जावळी तालुक्यात हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असल्याने मतदानावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. एक मतदार एक पोलिस बंदोबस्तासाठी दिला जाणार आहे. त्यामुळे मतमोजणीनंतरच शिवेंद्रसिंहराजेंनी मतदारांची केलेली मनधरणी आमदार शिंदेंच्या सत्कारणी लागली का, हे स्पष्ट होणार आहे.

शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
सातारा जिल्हा बँक निवडणूक : सरकारमधले दोन मंत्री लढत आहेत अस्तित्वाची लढाई

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in