Land Scam Case : संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना ईडीकडून अटक

Patra chawl land scam case : पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीकडून अटकेची कारवाई... 1034 कोटी रुपयांचा घोटाळा
Land Scam Case : संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना ईडीकडून अटक
(फाइल फोटो)

मुंबईतील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकणात ईडीने आज मोठी कारवाई केली. शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रविण राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. 1034 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळा (Patra chawl land scam case) प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

एचडीआयएलची (Housing Development Infrastructure Limited) सहाय्यक कंपनी असलेल्या गुरूआशिष कंन्स्ट्रक्शनच्या (Guruashish Constructions) संचालकांपैकी एक आहेत. यापूर्वी डिसेंबर 2020 मध्ये उघडकीस आलेल्या पीएमसी बँक घोटाळा (PMC bank scam) प्रकरणात प्रविण राऊत यांचं नाव चौकशीतून समोर आलं होतं.

प्रविण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी 2010 मध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना 55 लाख रुपये बिनव्याजी कर्ज दिलं होतं, असं तपास यंत्रणांना चौकशीतून कळलं होतं. हे पैसे मुंबईतील दादर परिसरात फ्लॅट खरेदी करण्यासाठी वापरण्यात आले होते. ईडीकडून या पैशांच्या मुख्य सूत्रांचा तपास केला जात आहे.

गुरूआशिष कन्स्ट्रक्शनमध्ये प्रविण राऊत यांच्यासोबतच एचडीआयएलचे प्रमोटर सारंग आणि राकेश वधावन हे सुद्धा संचालक होते. 2018 मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने वधावनसह अन्य इतरांविरुद्ध म्हाडा प्राधिकरण आणि गोरेगाव येथील पत्रा चाळ येथील रहिवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

पत्रा चाळ घोटाळा काय आहे?

गुरूआशिष कन्स्ट्रक्शनने म्हाडासोबत गोरेगावमधील पत्रा चाळ पुनर्विकासासाठी करार केला होता. गुरूआशिष कन्स्ट्रक्शनला याठिकाणी 3,000 अधिक फ्लॅट तयार करायचे होते. एकूण फ्लॅटपैकी 672 फ्लॅट हे पत्रा चाळीतील रहिवाशांना दिले जाणार होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि गुरुआशिष फ्लॅटकडे राहणार होते.

दरम्यान, गुरूआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने कोणतंही बांधकाम न करता म्हाडा आणि पत्रा चाळीतील रहिवाशांची फसवणूक केली. गुरूआशिष कन्स्ट्रक्शनने ही जमीन 1,034 कोटी रुपयांना दुसऱ्या बिल्डरला विकली होती.

आधी छापेमारी नंतर अटक

याच पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने मंगळवारी मुंबई आणि पालघर येथील प्रविण राऊतांच्या घरी आणि कार्यालयात छापेमारी केली. या कारवाईनंतर मंगळवारी रात्री प्रविण राऊतांना मुंबईतील ईडी कार्यालयात आणण्यात आलं होतं. ईडीच्या चौकशीला प्रविण राऊतांकडून सहकार्य केलं जात नसल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर प्रविण राऊत यांना अटक करण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in