
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूर ओसरलाय, पण नुकसान भरून काढणं काही दोन-चार दिवसांचं काम नाहीये....आर्थिक नुकसान तर झालंच आहे, पण राहण्या आणि खाण्या-पिण्याचीही भ्रांत अनेकांसमोर आहे. या पुराच्या पाण्यात अनेकांची महत्वाची कागदपत्रही वाहून गेलेली असू शकतात, किंवा पाण्यात भिजल्याने खराब झाली असू शकतात. मग सातबाऱ्याचे उतारे, रेशन कार्ड, आधार-पॅन कार्ड, जन्म-मृत्यूचे दाखले, बँकेची कागदपत्र परत कशी मिळवायची? त्यासाठीची तक्रार किंवा अर्ज कुठे दाखल करायचे या सगळ्याची माहिती आज तुम्हाला आम्ही देणार आहोत...
सातबाऱ्याचे उतारे
सगळ्यात पहिले ग्रामीण भागाच्या दृष्टीने महत्वाचं ते म्हणजे सात-बाऱ्याचे उतारे. तसे सातबाऱ्याचे उतारे हे तहसील कार्यालयातच असतात, फक्त त्यासाठी एक सर्व्हे नंबर असतो. तो सर्व्हे नंबर दिला, तर तहसील कार्यालयातून तुम्हाला उतारे मिळू शकतात. आता हा सर्व्हे नंबर तुमच्याकडे नसेल, आठवत नसेल तरी घाबरून जाण्याची गरज नाही. पुराच्या स्थितीत तुमचं नाव सांगूनही तहसील कार्यालयातून तुम्हाला सातबाऱ्याचे उतारे मिळू शकतील. शिवाय हे सगळे उतारे तुम्हाला ऑनलाईनही काढता येऊ शकतात.
bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचा विभाग निवडून मग जिल्हा तालुका आणि गाव निवडून त्यात माहिती टाकलीत, की तुमचा सातबाऱ्याचा उतारा ऑनलाईनही काढता येईल.
रेशन कार्ड
जर तुमचं रेशन कार्ड पुरात खराब झालं असेल तरी चिंता करायची गरज नाही. प्रत्येक रेशन दुकानावर ई-रजिस्टरमध्ये रेशन कार्डधारकाची नोंद असते. ही नोंद, तुमचं युनिट किती होतं ते अशी सगळी माहिती लिहून तुम्हाला तहसील कार्यालयात अर्ज करावा लागेल. आणि साधारण 15 दिवसांत तुम्हाला रेशन कार्ड मिळू शकेल.
आता पुराची परिस्थिती असल्यामुळे रेशन दुकानावर असलेल्या नोंदीद्वारेही तूर्तास अन्न दिलं जातंय. रेशन दुकानात नोंद असल्यामुळे आणखी कोणत्या डॉक्यूमेंट्सची शाहनिशा न करता पूरग्रस्तांना धान्य दिलं जातंय, अशी माहिती आम्हाला चिपळूणचे तहसीलदार प्रवीण पवार यांनी दिली आहे. शिवाय mahafood.gov.in या वेबसाईटवर जाऊनही तुम्ही ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड मिळवू शकता.
बँकेची कागदपत्रं
जर तुमचे बँकेची कोणती कागदपत्र पुराच्या पाण्यात भिजली असतील, तर बँकेच्या ज्या शाखेत तुमचं खातं आहे, तिथे जाऊन तुम्हाला अर्ज द्यावा लागेल. ज्यात तुमचं चेकबूक, पासबूक भिजलंय असं लिहावं लागेल. आणि हा अर्ज केल्यास तुम्हाला तुमची कागदपत्र परत मिळतील. तुमच्याकडे आधार कार्डसारखी ओळखपत्र नसतील तरीही पुराच्या स्थितीत नाव सांगून तुम्हाला बँक कागदपत्र देईल, अशी माहिती आम्हाला रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी सांगितलंय.
जन्म-मृत्यूचा दाखला
जन्म आणि मृत्यूचे दाखले जर पावसाच्या पाण्यात खराब झाले असतील, किंवा विवाह प्रमाणपत्र हवं असेल, तर त्यासाठी नगरपालिकेच्या जन्म-मृत्यू दाखला जिथो मिळतो, त्या विभागात जाऊन अर्ज करावा लागेल, त्यानंतर तुम्हाला हे डुप्लिकेट दाखले मिळतील. खेडेगावांमध्ये ग्रामपंचायतीतही हे काम होऊ शकतं.
आधार कार्ड
याशिवाय आधार कार्ड जर तुमचं खराब झालं असेल तर तेही तुम्हाला eaadhaar.uidai.gov.in वरून काढता येईल. शिवाय जर तुमच्याकडे ऑनलाईन प्रणाली नसेल. तर आधार कार्ड केंद्र ही पोस्ट ऑफीस किंवा तहसील ऑफीसमध्येही आहेत, तिथूनही तुम्हाला आधार कार्ड मिळू शकतं. तुम्हाला तुमचा आधार नंबर जरी लक्षात नसेल तरी पोस्ट ऑफीस किंवा तहसील केंद्रात नाव आणि तुमच्या अंगठ्याचा ठसा ओळखून आधार कार्ड नव्याने तुम्हाला मिळू शकतं.
आता हे सगळे डॉक्यूमेंट्स तुमचे पुन्हा हरवले तरी तुमचं काही अडू नये, किंवा पुन्हा सरकारी कार्यालयाचे हेलपाटे घालावे लागू नयेत, म्हणून तुम्हाला यावर एक उपायही सांगतो.
केंद्र सरकारने 2015 मध्ये डिजिलॉकरची सुविधा सुरू केली आहे. तुमचे सगळे कागदपत्र तुम्ही या डिजिलॉकरमध्ये ठेऊ शकता. म्हणजेच. तुमच्याकडे आता जी-जी कागदपत्र आहेत, ती स्कॅन करून तुम्हाला या लॉकरमध्ये ठेवायची आहेत. आता हे काही बँकेचं लॉकर नाहीये. नावाप्रमाणेच ते डिजिटल आहे.
त्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये डिजिलॉकर हे अप इन्स्टॉल करावं लागेल. त्यानंतर त्यात साईंग अपचा पर्याय निवडून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका. तुम्हाला एक ओटीपी येईल. तो टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबरही टाकावा लागेल. त्यानंतर तुमचं लॉकर उघडलं जाईल. म्हणजेच तुमच्या फोनमध्ये तुम्ही हे लॉकर कधीही कुठेही घेऊन फिरू शकता. शिवाय पूर-भूकंप अशा कुठल्याच आपत्तीमुळे तुमच्या डॉक्यूमेंट्सना फटका बसण्याची भीतीही राहणार नाही.
डिजिलॉकरमध्ये तुम्ही अपलोड केलेले कागदपत्र ही ओरिजिनलच मानली जातात.