Baba Adhav: कष्टकऱ्यांचा आवाज कायमचा हरपला, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढावांचे निधन
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे आज (8 डिसेंबर) यांचे प्रदीर्घ आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ADVERTISEMENT

पुणे: महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे अढळ आधारस्तंभ, सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकऱ्यांचे खरे नेते म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे आज (8 डिसेंबर) पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 10 दिवसांपासून ते आयसीयूत (ICU) उपचार घेत होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक कार्यक्षेत्रात शोककळा पसरली आहे.
मागील बारा दिवसापासून पुना हॉस्पिटलमध्ये बाबा आढाव यांना दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला ते उपचारांना प्रतिसाद देत होते. मात्र आज आठ वाजून पंचवीस मिनिटांनी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झालं.
दरम्यान, उद्या सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे बाबा आढाव यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी कुठलीही धार्मिक विधी पार न पाडता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शरद पवारांसह दिग्गज नेत्यांकडून श्रद्धांजली
बाबा आढावांची प्रकृती ही मागील काही दिवसांपासूनच चिंताजनक होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (SP)चे अध्यक्ष शरद पवार यांनी 6 डिसेंबरला रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. दरम्यान, आज निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर शरद पवारांनी सोशल मीडियावरून बाबा आढाव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.










