अंध आई-वडिल 4 दिवस मुलाच्या मृतदेहसह घरात राहिले, दुर्गंधी पसरल्यानंतर पोलीस पोहोचले अन्...
Crime News : घरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांना संशय आला आणि अखेर त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अंध आई-वडिल 4 दिवस मुलाच्या मृतदेहसह घरात राहिले,
दुर्गंधी पसरल्यानंतर पोलीस पोहोचले अन्...
Crime News : हैदराबादमधील ब्लाइंड्स कॉलनीतून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने स्थानिकांना हादरा बसला आहे. येथील एका ज्येष्ठ दाम्पत्याने आपल्या 30 वर्षीय मुलाचा मृतदेह चार दिवस घरातच ठेवला होता. सर्वात भीषण म्हणजे मुलाचा मृत्यू झाल्याची त्यांना कल्पनाच नव्हती. घरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांना संशय आला आणि अखेर त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत युवकाची ओळख प्रमोद अशी आहे. तो आपल्या आई-वडिलांसोबत एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. प्राथमिक तपासातून असे समोर आले आहे की प्रमोदचा मृत्यू झोपेतच झाला असून ही घटना 4 ते 5 दिवसांपूर्वीची आहे. मृत्यू झाल्यानंतरही घरातील ज्येष्ठ दाम्पत्य, कालीवा रामना आणि शांताकुमारी, यांना मुलगा प्रतिसाद देत नाही हे समजत होते; पण तो झोपलेला आहे, अशी त्यांची समजूत होती. दोघंही वयोमानामुळे अशक्त झाल्याने आणि त्यांचा आवाज मंद असल्याने शेजाऱ्यांनाही काहीच कळाले नाही.
चार दिवसांनंतर घरातून दुर्गंध येऊ लागल्याने एका शेजाऱ्याने पोलिसांना तक्रार केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना घरात प्रमोदचा मृतदेह आणि त्याचे आई-वडिल थोडसे बेशुद्ध असल्याप्रमाणे दिसले. मात्र, पोलिसांनी तात्काळ दोघांना जागं केलं, त्यानंतर पाणी आणि जेवण दिले. त्यांची प्रकृती सावरल्यानंतर पुढील काळजीसाठी त्यांना त्यांच्या मोठ्या मुलाकडे सोपवण्यात आले.
पोलिसांच्या तपासात अजून काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कालीवा रामना हे निवृत्त सरकारी कर्मचारी असून पत्नी शांताकुमारी यांच्यासह ते मुलगा प्रमोदसोबत राहत होते. मोठा मुलगा दुसऱ्या शहरात स्वतंत्र राहत असल्याचे समजते. काही वर्षांपूर्वी प्रमोदच्या पत्नीने त्याला सोडून दिले होते आणि दोन मुलींना सोबत घेऊन ती माहेरी परतली होती. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार प्रमोदला मद्यपानाची सवय होती.










