मुंबईत पुन्हा आगीचं तांडव! स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी वाचवले दहा जणांचे प्राण

मुंबईतील कांजूरमार्गमधील सॅमसंग मोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये उडाला आगीचा भडका : दोन ते अडीच तासांनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश
मुंबईत पुन्हा आगीचं तांडव! स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी वाचवले दहा जणांचे प्राण
मुंबईतील कांजूरमार्गमधील सॅमसंग मोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये आग लागल्यानंतरचं दृश्य.

मुंबईतील लालबाग परिसरातील बहुमजली रहिवाशी इमारतीत लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच शहरातील कांजूरमार्ग परिसरात आगीचा भडका उडाला. मुंबईतील कांजूरमार्ग पूर्व भागात असलेल्या एका सॅमसंग कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला आग लागली. सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस आणि स्थानिकांनी वेळीच मदत केल्याने दहा जणांचे प्राण वाचले. (Fire breaks out at Samsung Service Centre in Kanjurmarg East)

मुंबईतील कांजूरमार्ग पूर्व भागात असलेल्या पोलीस ठाण्याजवळील सॅमसंग कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये सोमवारी रात्री आग लागली. आगीचा भडका उडाल्यानंतर अवघ्या काही वेळातच इतर ३ कंपन्यांना आगीनं कवेत घेतलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने दुर्घटना स्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अडकलेल्या दहा नागरिकांना सुखरुपपणे बाहेर काढत त्यांचे प्राण वाचवले.

मुंबईतील कांजूरमार्गमधील सॅमसंग मोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये आग लागल्यानंतरचं दृश्य.
Mumbai Fire : जीव वाचवण्याच्या धडपडीत हात सुटला अन्...; मुंबईतील आगीची भयंकर दृश्ये

'साडे ते नऊ वाजेच्या दरम्यान कांजूरमार्ग पू्र्वमध्ये आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कांजूरमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत सॅमसंग कंपनीचं सर्व्हिस सेंटर आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. याची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आले. बचाव कार्याबरोबरच आग विझवण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं', अशी माहिती झोन 7 चे डीसीपी प्रशांत कदम यांनी दिली.

आगीनंतर सिलिंडरचा स्फोट झाल्याचीही चर्चा होती. त्यावर बोलताना कदम म्हणाले, 'हे सर्व्हिस सेंटर आहे. तिथे रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आहे. तिथे कॉम्प्रेसर आहे. कदाचित ते जळाल्यानंतर त्याचा स्फोट झाला असावा, त्याचा तो आवाज असावा. कंपनीत काही सुरक्षा रक्षक होते. त्यांना बाहेर काढण्यात आलं. सर्व्हिस सेंटरच्या बाजूला असलेल्या गोदामा तेल आणि डेकोरेशनचं साहित्य आहे. त्यामुळे आग जास्त पसरली', असं प्रशांत कदम म्हणाले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करत दोन ते अडीच तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलं. या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. तसेच कुणी जखमीही झालेलं नसल्याचं अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

आग पूर्णपणे विझवण्याचं काम सुरू असल्यानं आगीचं कारण शोधण्याच्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आलेला नाही. तपासानंतरच आग लागण्याचं नेमकं कारण कळेल. इथे वेगवेगळे गाळे आहेत. त्यामुळे किती कंपन्यांना आग लागली हे आताच सांगता येणार नाही, अशी माहिती अग्निशमनच्या अधिकाऱ्याने आग आटोक्यात आणल्यानंतर दिली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in