
स्वाती चिखलीकर, प्रतिनिधी, सांगली
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या साडेतीन वर्षांच्या मुलाची त्याच्या आईनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीत समोर आली आहे. या प्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात महिलेवर आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून करणे आणि प्रेताची विल्हेवाट लावणे असे दोन्ही गुन्हे या दोघांवर दाखल करण्यात आले आहेत. संशयित महिलेचा पती सुशांत वाजे याने आष्टा पोलीस ठाण्यात यासंबंधीची तक्रार दिली होती.
सुशांत वाजे याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याची पत्नी प्राचीचे बिळाशी या गावात राहणाऱ्या अमरसिंह पाटील याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची शंका होती. 27 जून 2021 ला प्राची मुलगा मनन याला घेऊन काहीही न सांगता निघून गेली. ती अमरसिंह पाटील यांच्या मुंबईतल्या घरी राहण्यास गेली होती. त्यानंतर मननचा अनैतिक संबंधांमध्ये अडथळा येऊ लागला.
ज्यानंतर प्राची आणि अमरसिंह पाटील यांनी मननचा शारिरीक छळ सुरू केला. दोघांनी त्याची हत्या केली आणि प्रेताची विल्हेवाट लावली. मननला मुंबईला ठार केल्यानंतर दोघे बिळाशी या ठिकाणी आले. तिथल्या ग्रामसेवकाकडून बिळाशीमध्ये मनन चा मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली. वाकुर्डे या ठिकाणी त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून प्रेताची विल्हेवाट लावली असंही सुशांत वाजेने फिर्यादीत म्हटलं आहे. ज्यानतर पोलिसांनी सुशांतची पत्नी प्राची आणि तिचा प्रियकर अमरसिंह पाटील या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. अत्यंत धक्कादायक अशा घटनेने सांगली हादरलं आहे.