जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन, भाषण सुरू असतानाच आरोपीने झाडल्या गोळ्या

Shinzo Abe शिंजो आबे नारा येथे भाषण करत असतानाच एका हल्लेखोराने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या...
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन, भाषण सुरू असतानाच आरोपीने झाडल्या गोळ्या

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची मृत्युशी सुरू असलेली झुंज संपली. शिंजो आबे यांच्यावर सकाळी ८ वाजता एका आरोपीने गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात शिंजो आबे गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर आज सकाळी दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गोळी लागल्याने त्यांना प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. गोळी लागल्याने त्यांना ह्रदयविकाराचा झटकाही आला होता.

गोळीबारात जखमी झालेल्या शिंजो आबे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, डॉक्टरांना यश आलं नाही. उपचार सुरू असतानाच त्यांचं निधन झालं.

माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीला पोलिसांनी लगेच अटक केली. घटनास्थळावरून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोराने सांगितलं की, 'शिंजो आबे यांच्या अनेक मतांशी मी सहमत नव्हतो आणि त्यामुळेच मी त्यांना मारलं.'

४१ वर्षीय संशयित आरोपीचं नाव यामागामी तेत्सुया असं असून, आरोपी सेल्फ डिफेन्स फोर्सचा सदस्य होता. ज्या बंदुकीतून शिंजो आबे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, ती बंदूक पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केली आहे.

यामागामी तेत्सुया हा नारा शहरातीलच रहिवाशी आहे. वृत्तानुसार तो तटरक्षक दलात सेवेत होता. त्याने २००५ पर्यंत म्हणजे तीन वर्ष तटरक्षक दलात काम केलं. शिंजो आबे यांच्या काही मतांमुळे तो नाराज होता आणि त्यामुळेच त्याला त्यांची हत्या करायची होती.

निवडणुकीचा प्रचार करत होते आबे

शिंजो आबे यांच्यावर ज्यावेळी गोळीबार करण्यात आला, त्यावेळी ते भाषण करत होते. रविवारी जपान संसदेच्या वरिष्ठ सभागृहाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचा प्रचार ते करत होते. शिंजो आबे भाषण करत असतानाच त्यांच्यावर दोन गोळ्या झाडणण्यात आल्या. पहिली गोळी त्यांच्या छातीच्या जवळ लागली, तर दुसरी गोळी त्यांच्या गळ्यावर लागली होती.

सर्वाधिक काळ जपानचं पंतप्रधानपद भूषणवणारे शिंजो आबे यांचं निधन झाल्यानंतर सध्या पंतप्रधान फुमिओ किशिदा हे भावूक झाले. शिंजो आबे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर किशिदा यांनी देशाला संबोधित केलं. शिंजो आबे यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचं ते म्हणाले.

२०२० मध्ये शिंजो आबे यांनी दिला होता राजीनामा

शिंजो आबे यांनी २०२० मध्ये पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. प्रकृती बरी नसल्याने त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. शिंजो आबे यांचे भारताशीही मित्रत्वाचे संबंध होते. ते पंतप्रधान असताना भारत-जपान यांच्यातील संबंध मजबुत झाले होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पंतप्रधान मोदी यांच्यासोबतही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. गेल्या वर्षी भारताने शिंजो आबे यांचा पद्म विभूषण हा नागरी पुरस्कार देऊन सन्मान केला होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in