'गुजरात मॉडेल चार प्रकारच्या लोकांसाठी वाईट', अशोक मोची मोदी-भाजपबद्दल काय बोलले?

गुजरात दंगल पोस्टरबॉय म्हणून प्रसिद्ध झालेल्या अशोक मोचीची गुजरात मॉडेलवर टीका करणारी मुलाखत व्हायरल झालीये...
'गुजरात मॉडेल चार प्रकारच्या लोकांसाठी वाईट', अशोक मोची मोदी-भाजपबद्दल काय बोलले?

गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या दंगलीच्या काळात एक फोटो सगळीकडे छापून आला. फोटोत एक व्यक्ती हातात लोखंडी रॉड घेऊन दोन्ही हात उंचावून आक्रमक भाव देताना दिसत आहे. त्या व्यक्तीचं नाव अशोक मोची. गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होत असून, अशोक मोची पुन्हा चर्चेत आलेत. अशोक मोचींनी थेट गुजरात मॉडेलवरून नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीका केलीये.

गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. यावेळी भाजप, काँग्रेसबरोबर आम आदमी पार्टीही गुजरातच्या निवडणूक मैदानात उतरलीये. गुजरातमधील सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे आप, काँग्रेसही जोर लावताना दिसत आहे.

अशात गुजरात दंगलीदरम्यानच्या फोटोमुळे प्रसिद्ध झालेल्या अशोक मोचीची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झालीये. या मुलाखतीत बोलताना अशोक मोची गुजरात मॉडेलवरून सरकारवर टीका करत आहेत. नरेंद्र मोदींवरही त्यांनी भूमिका मांडलीये. हा व्हिडीओ काँग्रेसच्या नेत्यांकडून ट्विटर शेअर करण्यात आलाय. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्हींनीही हा व्हिडीओ शेअर केलाय.

अशोक मोची मुलाखतीत काय म्हणाले आहेत?

"गुजरात मॉडेल तीन लोकांसाठी वाईट आहे, गरिबांसाठी, दलितांसाठी, मुस्लिमांसाठी, पीडितांसाठी. दुसऱ्यांसाठी चांगलं असेल, तर ते मला माहिती नाही. अदानी, अंबानींसाठी चांगलं असेल. जातीवाद्यांसाठी, भ्रष्टाचाऱ्यांसाठी चांगलं असेल, पण, चार लोकांसाठी गुजरात मॉडेल फेल आहे. माझ्यासाठी गुजरात मॉडेल फेल आहे", असं अशोक मोची म्हणत आहेत.

"ज्या व्यक्तीचा फोटो देश-विदेशात, डॉक्युमेटरींमध्ये, मीडियामध्ये, पुस्तकांमध्ये दाखवली जाते, तोच व्यक्ती इथं राहतोय, याचा अर्थ काय? तुम्ही जेव्हा मोदींची मुलाखत घ्यायला जाल, तेव्हा मोदींना विचारा की, अशोक मोची फूटपाथवर राहतोय. ते हिंदुत्वाचा चेहरा आहेत. ते हिंदूत्वाचे नेते आहेत, तर अशोक मोची इथे का राहतोय?", असंही अशोक मोची म्हणताहेत.

मोदी किंवा भाजपकडून ऑफर आली, तर जाणार का? या प्रश्नावर अशोक मोची म्हणतात, "मोदींनी गुजरातच्या गादीवर 13 वर्ष राज्य केलं. मोदी इथून तिथे गेलेत. तिथून इथे आलेले नाहीत. गुजरातमधून दिल्लीत गेलेत. निवडणुकीच्या काळात दर्यापूर, शहापूरमध्ये आलेत. आजपर्यंत मोदी इथे आलेले नाहीत", असं उत्तर अशोक मोचींनी दिलं.

"मला भेटायला ना मोदी आले, ना त्यांच्या पक्षाचं कुणी. त्याच्या पक्षात जे दलित समाजातील आहेत, तेही आले नाही", अशोक मोची म्हणत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in