
मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी आलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना दिवसअखेर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आज सकाळी ९ वाजता राणा दाम्पत्य मातोश्री येथे जाऊन हनुमान चालीसा पठण करणार होतं. मात्र, दिवसअखेर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री येथे हनुमान चालीसा म्हणण्याचं आव्हान नवनीत राणा आणि रवि राणा यांनी दिलं होतं. काही दिवसांपूर्वी २३ एप्रिल रोजी आपण मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं म्हटलं होतं.
त्यानंतर शुक्रवारपासून (२२ एप्रिल) मुंबईतील वातावरण तापण्यास सुरूवात झाली. शुक्रवारी सकाळी राणा दाम्पत्य नागपूरहून मुंबईत दाखल झालं. त्यानंतर काल दिवसभर शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर तळ ठोकला होता. रात्रभर शिवसैनिक मातोश्रीबाहेर होते. त्यानंतर आज सकाळपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या.
सकाळी शिवसैनिकांनी मातोश्रीबरोबर नवनीत राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर गर्दी करण्यास सुरूवात केली. त्यानंतरही राणा दाम्पत्याने व्हिडीओद्वारे आपण हनुमान चालीसा पठण करण्यासाठी जाणार असल्याची भूमिका घेतलेली होती. त्यानंतर दुपारी त्यांनी भूमिकेवरून माघार घेतली.
सायंकाळी खार पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना त्यांच्या खार येथील निवासस्थानातून ताब्यात घेतलं. पोलीस दोघांना खार पोलीस ठाण्यात घेऊन आले आणि त्यानंतर पोलिसांनी कायदेशिर प्रक्रिया पार पाडत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली. खार पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध भादंवि १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.