राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे Emergency चा मुद्दा संपला आहे का?

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आणीबाणी ही एक चूक होती असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं. त्यामुळे पुन्हा एकदा आणीबाणीची चर्चा सुरू झाली आहे. विरोधक राहुल गांधींना नावं ठेवत आहेत. देशातल्या आणीबाणीचा मुद्दा हा काँग्रेस विरोधक आणि इंदिरा गांधींच्या विरोधकांनी जिवंत ठेवला आहे. कोळसा किती उगाळला तरीही काळाच या म्हणीप्रमाणे हा मुद्दा नेहरू गांधी घराण्याचे आणि काँग्रेसचे विरोधकच वारंवार उगाळत असतात. आणीबाणीचा प्रश्न हा खरंतर तेव्हाच संपलेला होता. मात्र या प्रश्नाचे तीन भाग आहेत ते महत्त्वाचे आहेत. ते समजावून न घेताच या प्रश्नाची चर्चा होते.

हे तीन भाग असे आहेत की ‘आणीबाणी अपरिहार्य का झाली?’ ‘आणीबाणीच्या काळात काय काय घडलं?’ आणि ‘आणीबाणी इंदिरा गांधींनी मागे का घेतली?’ या तीन मुद्द्यांवर चर्चा होणं अपेक्षित असतं. मात्र लोक फक्त आणीबाणीच्या काळात काय घडलं? त्याचीच चर्चा करतात. आणीबाणी आणणं अपरिहार्य का होतं? याची अनेक उदाहरणं आहेत. १२ जून १९७५ ला अलहाबाद न्यायालयाचा निकाल इंदिरा गांधींच्या विरोधात लागला. त्यानंतर इंदिराजींनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयालाही हे वाटलं होतं की इंदिरा गांधी पंतप्रधान राहू शकतात. तसा निर्णयही कोर्टाने दिला. तरीही रामलीला मैदान आणि अन्य ठिकाणी जयप्रकाश नारायण आणि इतर आंदोलकांनी विविध सभा घेतल्या आणि इंदिरा गांधींच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. जर इंदिरा गांधींनी राजीनामा दिला नाही तर पंतप्रधानांच्या घराभोवती काही लाख लोक आम्ही जमा करू असा इशाराही जयप्रकाश नारायण यांनी दिला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रत्यक्षात इंदिरा गांधींना पंतप्रधानपदी राहण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली होती. या प्रकरणात अलाहबाद न्यायालयाने दिलेला निर्णय कसा चुकीचा आहे हे स्वतः पालकीवाला यांनीही स्पष्ट केलं होतं. तरीही धमकीचं राजकारण केलं गेलं. जयप्रकाश नारायण यांनी स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग घेतला होता. तरीही त्यांनी शोभत नसणारं राजकारण त्यावेळी केलं. सरकारचे आदेश पोलीस आणि सैन्याने पाळू नयेत असंही वक्तव्य केलं होतं. ही बाब म्हणजे थेट बंडाळी पुकारणंच होतं.

ही सगळी परिस्थिती निर्माण होण्याच्या काही महिने आधी देशात रेल्वेचा संप झाला होता तेव्हा जॉर्ज फर्नांडिस यांनी अशी घोषणा केली होती की देशात अन्न धान्य कुठेही नीट पोहचणार नाही अशा प्रकारे संप करायचा. अन्न धान्य नीट पोहचलं नाही तर देशात अराजक माजेल आणि लोक सत्ता उलथवून टाकतील असा विश्वास त्यांना होता. १९ महिन्यांनी जेव्हा आणीबाणी संपुष्टात आणली गेली तेव्हा इंदिरा गांधींनी एका प्रश्नाच्या उत्तरात असं म्हटलं होतं की आणीबाणीच्या काळात जे काही घडलं त्याचं संपूर्णतः समर्थन करता येईल असं नाही. त्याबद्दल मी खेद व्यक्त करते. राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य यापेक्षा काहीही वेगळं नाही.

ADVERTISEMENT

आता देशात नरेंद्र मोदी यांच्या काळात त्यांच्या दहशतबाजीची आणि जी हुकुमशाही देशात सुरू आहे..तिचा संदर्भ देताना सगळ्यांना इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीची आठवण येते. मात्र संदर्भ देताना अनेकांना त्यावेळची आणि आत्ताची राजकीय परिस्थिती किती भिन्न होती ते लक्षात येत नाही. त्यावेळी देशातंर्गत दहशतवाद वाढत होता ही बाब कुणी लक्षातच घेत नाही. इंदिरा गांधींना आणीबाणी आणण्यासाठी जयप्रकाश नारायण आणि तत्सम लोकांनी भाग पाडलं याबद्दल कुणीही चर्चा करत नाही.

ADVERTISEMENT

1999 आणि 2021 : Congress मधल्या दोन भिन्न संघर्षांची कहाणी

१९७५ ची तुलना ही आत्ताच्या काळाशी होऊ शकत नाही. तेव्हा देशात जातीयवादाचं वातावरण नव्हतं. मॉब लिंचिंगच्या घटनाही घडत नव्हत्या. लष्कराला जसं आव्हान दिलं जातं आहे तसं दिलं जात नव्हतं. आज शेतकऱ्यांनी जे आंदोलन सुरू केलं आहे ते शांततेच्या मार्गाने केलं आहे. पंतप्रधानांच्या घराला त्यांनी घेराव घालण्याची भाषा केलेली नाही. त्या काळात गुजरातमध्ये काही आमदारांना घरातून खेचून बाहेर काढून त्यांची धिंड काढण्यात आली आहे. त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं आहे. अशा घटना त्यावेळी घडल्या होत्या. निवडून आलेल्या आमदारांना ठोकून काढणं हे प्रकार त्यावेळी घडत होते. ललित नारायण मिश्र यांचा खून कुण्या दहशतवाद्याने केला नव्हता. या सगळ्या गोष्टीही विचारात घ्याव्या लागतील.

१९७५ मध्ये देशात दुष्काळ पडला होता. या दुष्काळात अन्न-धान्य योग्य प्रमाणात देशात पोहचलं नाही तर आपण अऱाजक माजवू शकू असा आत्मविश्वास त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस यांना होता. त्यातून इंदिरा गांधींची सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न जॉर्ज फर्नांडिस ते जयप्रकाश नारायण या सगळ्यांनी केला होता.

आणीबाणी ही चूक होती ही बाब राहुल गांधी यांनी मान्य करून वेगळं काहीही केलेलं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. आणीबाणी संपल्यानंतर इंदिरा गांधी यांनीच चूक मान्य केली होती. आत्ता लोकशाहीच्या नावाखाली जे काही देशात सुरू आहे ती अघोषित आणीबाणी आहे त्यावरही राहुल गांधी यांनी भाष्य केलं आहे. जगभर एक सिद्धांत सुरू आहे तो हाच आहे की लोकशाहीच्या नावाखाली फॅसिझम आणता येतो. आत्ता ज्या प्रकारची हुकुमशाही मोदी चालवत आहेत त्याची तुलना १९७५ मधल्या परिस्थितीशी करताच येत नाही.

१९ महिन्यानंतर इंदिरा गांधी यांनी आणीबाणी मागे घेतली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सात वर्षे झाली मागे घेतलेली नाही कारण ती अघोषित आणीबाणी आहे. ती घोषितच केली नाही त्यामुळे ती मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. राहुल गांधी यांनी आणीबाणी ही चूक होती हे मान्य केलं त्यामुळे इंदिरा गांधी यांच्या काळात लादण्यात आलेल्या आणीबाणीचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. मात्र राहुल गांधी यांनी जे म्हटलं आहे ते इंदिरा गांधींनी त्याचवेळी म्हटलं होतं हे विसरून चालणार नाही. मात्र त्यावेळची परिस्थिती लक्षात न घेता इंदिरा गांधींवर टीका करण्याचं आणि त्यांना यावरून बदनाम करण्याचं कारस्थान अजूनही संपलेलं नाही. यापुढेही या विषयावर पडदा पडेल असं मुळीच वाटत नाही.

(काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी हा लेख लिहिला आहे)

    follow whatsapp

    ADVERTISEMENT