
Maratha Reservation प्रकरणावरून फक्त राज्यात राजकारण सुरू आहे. या देशाची पुन्हा फाळणी करायची आहे का सरकारला?असा प्रश्न मला पडला आहे. असंही खासदार उदयनराजे यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला मान्यता दिली नाही आणि याचं राजकारण सोडून जर सरकार राजकारण करत बसलं तर मराठा समाजाला उद्रेक होईल. तसं झालं तर त्या उद्रेकाला सरकार जबाबदार असेल असं वक्तव्य उदयनराजे यांनी केलं आहे. राज्य सरकारची इच्छाशक्ती नाही हे दिसतं आहे. हे असंच सुरू राहिलं तर लोकांचा उद्रेक होईल तेव्हा मी काय किंवा संभाजीराजे काय कुणीही मधे पडलं तरीही काहीही उपयोग होणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.
खासदार संभाजी राजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले या दोघांची आज भेट झाली. दोघांनीही मराठा आरक्षणावर चर्चा केली. या दोन नेत्यांमध्ये सुमारे 25 मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना उदयनराजेंनी हे भाष्य केलं आहे. संभाजीराजेंनी केलेल्या मागण्या योग्य आहेत माझा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. इथे घराणी वेगळी आहेत हा विषयच नाही. आमचं लक्ष्य एकच आहे ते म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळणं. ते मिळालंच पाहिजे नाहीतर लोकांचा उद्रेक होईल, ती वेळ येऊ देऊ नका असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.
23 मार्च 1994 ला एक जीआर काढण्यात आला त्यानंतर आरक्षण देण्यात आलं, ते रद्द करू नका. जीआर काढून मराठ्यांनाही आरक्षण द्या. आम्ही कधीही जातपात पाहिली नाही. पण जाणवतं आहे, बोलत असताना मित्र अंतर ठेवत आहेत. ही दुफळी या राज्यकर्त्यांनी निर्माण केली. समाजाचा याच्याशी काही संबंध नाही. राज्यकर्त्यांची इच्छा असेल तर समाजासाठी एकत्र यावं. मराठा समाजात मी काय किंवा संभाजीराजेंनी काय दुफळी निर्माण केलेली नाही. उद्या जर मराठा तरूणांचा उद्रेक झाला तर त्याला संभाजीराजेही जबाबदार नसतील आणि मीही नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. आम्ही दोघे मधे पडलो तर आमच्यावरही घणाघात होईल, आम्हाला बाजूला केलं जाईल. अशी वेळ येऊ देऊ नका, पण ती येईल असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.
मंडल आयोगाने ओबोसींना आरक्षण दिले. त्यावेळी दिल्लीतच होतो. तेव्हा दिल्लीत आरक्षण विरोधक आणि समर्थकांची रस्त्यावरच भोसकाभोसकी सुरु होती. मी दिल्लीत होतो ते मला आठवतंय… तुम्ही इशू बेस पॉलिटिक्स करा. समाजात तेढ निर्माण करू नका. कोर्ट कचेऱ्यावर मला अजिबात आता विश्वास नाही, काय घडणार हे मला माहिती आहे, असं ते म्हणाले.
पाच बोटं एकसारखे नसतात. सर्वांचे विचार वेगवेगळे असतात. माझे प्रिन्सिपल वेगळे आहेत, तुमचे वेगळे आहेत. मी कायदे बियदे मानत नाहीत. सुप्रीम कोर्टात कुणी गायकवाड आयोगाचा अहवाल वाचलाच नाही, हे माझं ठाम मत आहे. गरिबांना वंचितांना शिक्षणापासून का दूर ठेवताय?, असा सवालही त्यांनी केला.