पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील ऑडिओ क्लिप्सची चौकशी करा-फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांचं या प्रकरणात पोलीस महासंचालकांना पत्र
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचं पोलिसांना पत्र
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचं पोलिसांना पत्र Photo- India Today

बीडच्या परळी येथील 22 वर्षांची तरूणी पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणी विविध माध्यमांमध्ये आणि समाजमाध्यमांमध्ये विविध प्रकारच्या चर्चा होत आहेत. या संदर्भातल्या काही ऑडिओ क्लिप्सही व्हायरल होत आहेत. या सगळ्या प्रकरणावरून बंजारा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थेतेचं वातावरण आहे. ही बाब लक्षात घेऊन या प्रकरणाची आणि त्या व्हायरल ऑडिओ क्लिप्सची चौकशी करा अशी मागणी विधानसभेचे विऱोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

पूजा चव्हाणच्या आत्महत्ये संदर्भातल्या एकूण 12 क्लिप्स या समाजमाधम्यांमध्ये व्हायरल झाल्या आहेत. आपल्याला अवलोकनार्थ ऑडिओ क्लिप्सची प्रत या पत्रासोबत जोडतो आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या ऑडिओ क्लिप्समध्ये बोलणारे कोण आहेत? त्यांच्या संवादांचा नेमका अर्थ काय? पूजा चव्हाणने आत्महत्या केली की तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं गेलं आहे का? या सगळ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. बंजारा समाजात अत्यंत लोकप्रिय असलेल्या पूजा चव्हाण या तरूणीला न्याय द्यावा आणि दोषींवर योग्य ती कठोर कारवाई करावी अशीही मागणी फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील यांनीही पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण?

बीडमधील परळी येथील असलेली पूजा चव्हाण ही तरूणी काही दिवसांपूर्वी इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती. पूजा तिचा भाऊ आणि मित्रासोबत वानवाडी येथील हेवन पार्क सोसायटीत वास्तव्य करत होती. सोशल मीडियावर खासकरून टिकटॉक App मुळे ती प्रचंड लोकप्रिय झाली होती. मात्र सोमवारी म्हणजेच 8 फेब्रुवारीला तिने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. त्यानंतर काही दिवसातच या प्रकरणाशी विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याचे आरोप झाले. पूजाने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं तिच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. आता या प्रकरणावरून 12 ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींना शिक्षा व्हावी अशी मागणी करणारं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना लिहिलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in