जितेंद्र आव्हाडांच्या ओबीसींबद्दलच्या विधानामुळे नव्या वादाला फुटलं तोंड; राजीनाम्याची मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या एका विधानानं राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. जितेंद्र आव्हाडाचं विधानावर बोट ठेवत भाजप आक्रमक झाली असून, थेट जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे आणि गोपीचंद पडळकर यांनीही या विधानावरून जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मात्र थेट उत्तर देण्याचं टाळलं.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?

ठाण्यात ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना आव्हाड यांनी हे विधान केलं. “खरं तर ओबीसींवर फारसा विश्वास नाही. आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं, तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. लढायला महार समाज होता. कारण ओबीसींनी लढायचंच नव्हतं. ओबीसींवर ब्राह्मण्यवादाचा पगडा इतका आहे की, आपण श्रेष्ठ आहोत असं त्यांना वाटतं. पण त्यांना हे माहिती नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला देवळात सुद्धा येऊ देत नसत. ते हे सर्व विसरले आणि आता आरक्षणासाठी पुढे येतात. नुसतं घरात बसून व्हॉट्सअप करुन चालणार नाही. रस्त्यावर यावं लागणार आहे, केंद्र सरकारशी दोन हात करावे लागतील”, असं आव्हाड म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भाजपने भाषणाचा व्हिडीओ केला शेअर, राजीनाम्याची मागणी

“जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध! ‘माझा ओबीसी समाजावर फार विश्वास नाही’, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ओबीसी समाजाचा अपमान करणारे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा राष्ट्रवादी घेणार का? राष्ट्रवादीच्या मनात ओबीसी समाजाबद्दल एवढा राग का? यासाठीच ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवलं का?”, असं म्हणत भाजपच्या ट्विटर हॅण्डलवर भाषणाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

बावनकुळेंचा शरद पवारांना सवाल

ADVERTISEMENT

“राजकारणात आपली पोळी भाजण्यासाठी ते असं वक्तव्य करतात. शरद पवार यांनी आता सांगितलं पाहिजे की, ते जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचं समर्थन करतात का? सर्व समाज एकमेकांना साथ देत आहेत. मदत करत आहेत. अशावेळी असं वक्तव्य करुन ते तेढ निर्माण करत आहेत. त्यांनी ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे”, असं म्हणत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

“आव्हाड कोणता इतिहास वाचतात?”

“जितेंद्र आव्हाड म्हणतात माझा ओबीसीवर विश्वास नाही, कारण मंडल आयोग येताना ते लढले नाहीत. आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहीत नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला होता. वंचितांच्या आरक्षणाला नाकं मुरडली होती. शेकडो ओबीसींनी स्वतःला पेटवून घेतलं होतं. हा ओबीसींचा इतिहास माहीत नाही का तुम्हाला?,” असा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हाडांना केला आहे.

अजित पवार म्हणाले…

जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समुदायाबद्दल केलेल्या विधानावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना प्रश्न केला. त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्रात कोण काय म्हणालं, याची उत्तरं द्यायला मी मोकळा नाही. मी माझी मतं स्पष्टपणे सांगण्यासाठी केव्हाही तयार असतो. त्यांनी काय म्हटल हे तुम्ही त्यांनाच विचारा”, असं म्हणत अजित पवारांनी जास्तीच भाष्य करणं टाळलं.

वडेट्टीवारांनी केलं आव्हाडांचं समर्थन

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र आव्हाड यांनी केलेल्या विधानाचं समर्थन केलं आहे. “जितेंद्र आव्हाड बोलले ते खरं आहे. त्यावेळी ओबीसी बांधवांची डोकी मनुवाद्यांनी भडकविली होती. त्यामुळे काही ओबीसी मंडल आयोगाच्या विरोधात उभे ठाकले होते. वास्तविक मंडल आयोग हा ओबीसींच्या स्वसंरक्षणासाठी होता. आज ओबीसी समाजाला खरं काय ते कळलं आहे,” असं म्हणत वडेट्टीवारांनी आव्हाडांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT